पद्मश्री विनायक खेडेकर यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा
पं. रत्नकांत रामनाथकर यांनी संगीत क्षेत्रात मोठा शिष्य संप्रदाय घडविला. भारतीय संगीत परंपरा अव्याहतपणे सुरु ठेवण्यामागे आणि गोव्याचे नाव जगाच्या नकाशावर प्रतिभावंतांचा प्रांत म्हणून नेण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. संगीताच्या इतिहासात रामनाथकर बुवांचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहील, असे उद्गार पद्मश्री विनायक खेडेकर यांनी काढले.
39 व्या पं. रत्नकांत रामनाथकर स्मृती संगीत संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नादब्रह्म संस्थेतर्फे पाटो पणजी येथील सांस्कृतिक भवनमध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गजानन गोलतकर, सल्लागार गोविंद गायतोंडे, पं. रामनाथकर यांचे शिष्य पं. कमलाकर नाईक, बाबुराव बखले, धर्मानंद गोलतकर, शेखर आमोणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. कमलाकर नाईक यांनी रामनाथकर बुवांच्या स्मृतींना उजाळा दिला. रामनाथकर बुवा हे उत्तम हार्मोनियमवादक, जलतरंग वादक व तबलावादक म्हणून ओळखले जात. निर्जीव साजाला संजीवनी देणारे प्रतिभावंत आणि शास्त्रकार म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. पंडितजींनी अनेक स्थित्यंतरांना तोंड देत प्रवाहपतित न होता आपल्या विशुद्ध गायकीची श्रेष्ठ मुल्ये संगीताच्या माध्यमातून संवर्धीत केली. उच्च प्रतिभेचे गायक म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी किर्ती संपादन केली. त्यामागे त्यांची साधना, मेहनत आणि प्रबळ इच्छा शक्ती होती. विनायक खेडेकर यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कार लाभल्याबद्दल गजानन गोलतकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तीन सत्रात झालेल्या या संगीत संमेलनात सौ. सम्राज्ञी शेलार आईर, पं. कमलाकर नाईक यांचे शास्त्रीय गायन तर डॉ. उदय कुलकर्णी यांचे तबला एकलवादन झाले. गजानन गोलतकर यांनी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन तर शेखर आमोणकर यांनी आभार मानले.









