प्रतिनिधी/कोल्हापूर
नवरात्रौत्सव म्हंटलं की साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर गरबा, रास दांडियाचा जल्लोष हा आलाच. गतवर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे जारी केलेल्या निर्बंधामुळे मंडळांना दांडियाचा जल्लोष, आनंद साजरा करता आला नव्हता. सुदैवाने ऐन नवरात्रौत्सवाच्या तोंडावर कोरोना संसर्गाचे प्रमाण अगदी अत्यल्प झाल्याने शासनाने रास दांडिया, गरबा आयोजनास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील अनेक मंडळांनी आपल्या दुर्गामूर्तीसमोर रास दांडिया, गरबा आयोजनाच्या तयारीला जोरात सुरुवात केली आहे. उत्सव काळात रोज रात्री सानेगुरूजी वसाहतपासून कनाननगरपर्यंत आणि रमणमळापासून ते संभाजीनगरपर्यंतचा भाग आता दांडियांच्यानिमित्ताने मंडळांकडून लावल्या जाणाऱया साऊंड सिस्टीमवरील गाण्याची धुन दरवळत राहणार आहे.
नवरात्रौत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला तरी ही शासनाने दांडियाला परवानगी असणार की नाही, हे जाहीर केले नव्हते. दुसरीकडे कोरोनामुळे यंदाच्याही नवरात्रौत्सवात दांडिया अन् गरबा खेळता येणार नाही, अशी मंडळांनी समजूत करुन ठेवली होती. मात्र शासनाने कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबई वगळता राज्यातील मंडळांना मोकळी मैदान, सभागृह आणि बंद हॉलमध्ये दांडिया, गरबा आयोजनास परवानगी देऊन सुखद धक्काच दिला आहे. त्यामुळे आता उत्सव काळात रोज रात्री आठ वाजल्यापासून ते उशिरापर्यंत दांडिया व गरबाचा खेळ रंगणार हे उघड आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांना मास्क आणि सोशल डिस्टन्सचे बंधन सक्तीने पाळावे लागणार आहे.
याबाबत शहरातील विविध मंडळांशी संपर्क साधला असला कार्यकर्त्यांमध्ये दांडिया आयोजनाचा जोश पुर्वी इतकाच कायम असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. शिवाय हाच जोश घेऊन मंडळे रास दांडिया आयोजनासाठीच्या तयारीला लागले असल्याचेही पहायला मिळाले. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून ते विजयादशमीपर्यंतच्या रात्रीपर्यत सलग नऊ दिवस आयोजित केल्या जाणाऱया गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी लागणाऱया गाण्यांच्या संगीताच्या ठेक्यावर लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळी हरवून जाणार हे उघड आहे.
या मंडळांकडून होणार दांडियाचे आयोजन कंसात ठिकाण…
स्वामी समर्थ मित्र मंडळ (संभाजीनगर रोड)
सानेगुरूजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (सानेगुरुजी जूनी शाळा पटांगण)
राधेय ग्रुप (लक्ष्मी टेक अंबाबाई मंदिर, रावजी मंगल कार्यालयासमोर)
शिवनेरी तरुण मंडळ (देवणे कॉलनी, सानेगुरूजी वसाहत)
ओम तरुण मंडळ (उत्तरेश्वर महादेव मंदिर परिसर)
उत्तरेश्वर पेठ, राबाडे गल्ली वाईल्ड टायगर,
उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिरासमोरील जागेत ओम तरुण मंडळ.
न्यू शाहूपुरी तालीम मंडळ प्रणित जय भवानी महिला मंडळ (न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली)
स्वराज्य महिला मंडळ (कनाननगर, जाधव गल्ली)
नवदुर्गा महिला मंडळ (कनाननगर, जिल्हाधिकारी कार्यालयनजिक)