ऑनलाईन टीम / मुंबई:
हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतावर समान पकड असलेले लेखक, संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. भाटिया पाच वर्षे दिल्ली विद्यापीठात संगीताचे वाचकही होते. श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. भाटिया हे जाहिरात चित्रपटांसाठी स्वतंत्रपणे संगीत रचना करणारे देशातील पहिले संगीतकार होते.
‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जाने भी दो यारों’, ’36 चौरंगी लेन’ आणि ‘द्रोहकाल’ यांसारख्या चित्रपटांनी भाटिया हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाले. भाटिया यांना 1988 च्या ‘तमस’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्जनशील आणि प्रायोगिक संगीतासाठी त्यांना 1989 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.









