11 जणांवर गुन्हा दाखल, संगमेश्वर बाजारपेठेतील वातावरण झाले तणावमय
वार्ताहर/ संगमेश्वर
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या दुसऱया दिवशी रविवारी रात्री 8.30वा दरम्याने संगमेश्वर बाजारपेठेत दोन गटात झालेल्या राडय़ामुळे संगमेश्वर बाजारपेठेतील वातावरण तणावमय झाले होते. मारहाण करणाऱया दोन्ही गटातील 11जणांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. सुरेश रवींद्र सुर्वे रा कोंड आंबेड याने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, तो चुलत भाऊ गुरुप्रसाद नागवेकर ऋषिकेश संजय सुर्वे हे रा कोंड आंबेड यांच्यासह चारचाकी वाहनाने संगमेश्वर बाजारपेठेत रात्री 8.30 वा दरम्याने शेंगदाणे खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ऋषिकेश हा गाडी चालवत होता. ते सिध्दीविनायक बँगल जवळ आले असता तेथे रस्त्यावर प्रचित सुर्वे आणि त्याचे मित्र रस्त्यावर गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाने प्रचितच्या गाडीला धडक दिल्याने तो त्याचे मित्र याचा गैरसमज झाल्याने त्याने वाद करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांने समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही एकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी ऋत्विक गांधी हा ऋषिकेशच्या अंगावर धावून आला त्याला प्रचित सुर्वे, यश लोध हे सहकार्य करीत होते. प्रचितने त्याचे मित्र अनुप मंगेश प्रसादे, विनोद लोध यांना बोलावून घेतले. त्यानी ऋषिकेशला मारहाण केली. सुरेश रविंद्र सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रचित तुषार सुर्वे, ऋत्विक प्रवीण गांधी, अनुप मंगेश प्रसादे, विनोद लोध, यश नितीन लोध या पाच जणांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी फिर्याद प्रचित सुर्वे यांनी दिली आहे. त्याच्या फिर्यादेत असे म्हटले आहे की, प्रचित आणि त्याचे मित्र हे रात्री 8.30 वा दरम्याने त्याचे मित्र ऋत्विक गांधी, यश लोध हे सिध्दीविनायक बँगलच्या समोर दुचाकीवर थांबले असता ऋषिकेश संजय सुर्वे व संजय नारायण सुर्वे, सुदेश रवींद सुर्वे, गुरुप्रसाद नागवेकर, अजय भिमसेन नागवेकर, अक्षय दशरथ नागवेकर हे सर्व राहणार कोंड आंबेड यांनी ऋत्विक गांधी व त्यांच्या मित्रांना मारहाण केली तसेच शिवीगाळ केली. त्याच्या फिर्यादावरुन 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन गटांतून आलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनंतर दोन्ही गटातील 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वर बाजारपेठेत वातावरण तणावय
संगमेश्वर बाजारपेठेत दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर संगमेश्वर पोलीस निरीक्षक उदय झावरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहकाऱयासमवेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला तसेच मारहाण करणाऱया दोन्ही गटातील संशयितांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यामुळे वातावरण शांत झाले.









