वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाची कामे अद्यापही सुरु न झाल्याने वाहनचालकांना पावसाळ्यात धोकादायक प्रवास करावा लागणार आहे. लॉकडाऊन दरम्यान महामार्गावरील रखडलेली कामे सुरु करण्याचे आदेश मिळताच या मार्गावरील फक्त पुलांचीच कामे सुरु करण्यात आली आहेत.
महामार्गावरील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रातील कामं दोन वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर ही कामे अद्यापही ठप्प आहेत. अर्धवट कामे ठेवण्यात आल्याने याचा धोका अधिक वाढला आहे. मोऱया रंद करण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे महामार्गावर धावणाऱया वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी खोदकाम केल्याने पावसाळ्यात पाणी साचून महामार्गावरुन धावणाऱया वाहनांना धोका आहे.
मार्गावरील धोकादायक ठिकाणी कोणतेही फलक न लावल्याने चालकांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्याने अपघात होतात. यावर्षी पावसाळ्यापूर्वीची कोणतीही तयारी करण्यात न आल्याने त्याचा धोका अधिक आहे. संगमेश्वर शहरातून 10 मिटर वाढीच्या प्रस्तावावर अजुनही कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसल्याने तो प्रश्न प्रलंबित आहे. या मार्गावरील फक्त पुलांची कामे सुरु करण्यात आलेली आहे. उर्वरित कामे रखडल्याने वाहनचालक व प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.









