देवरुख/ प्रतिनिधी :
संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावात आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरची महिला ठाण्यातुन गावी आली होती.
याबाबत तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सदरची महिला आपल्या कुटुंबासह २१ एप्रिलला बामणोलीत आली होती. तिच्यासह एकूण ९ जण आले होते. तिच्या भावाचे मुंबईत निधन झाले. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करून ती कुटुंबासह उत्तरकार्य करण्यासाठी गावी आली होती. याची माहिती मिळताच स्थानिकांनी याची माहिती तालुका प्रशासनाला दिली. त्यानंतर लगेच २२ एप्रिल रोजी या सर्वांना साडवलीमधील ठाकरे हायस्कूल मधे क्वॉरंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी या सर्वांसह एकूण ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हाधिकारी मिश्रा यांनीही माहिती शनिवारी सकाळी जाहीर दिली. सोशल मीडिया आणि दूरचित्रवाणीवरुन याची बातमी समजताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान त्या महिलेला जिल्हा कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सदरची महिला व ते कुटुंब बामणोली गावात फिरल्याने हा परिसर सिल करण्याची कार्यवाही सुरु झाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली आहे.