काल आपण संक्रांतीचा सण साजरा केला. आज किंक्रांत म्हणजे करीदिन. हा फारसा शुभ मानत नाहीत .तरीही संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत स्त्रियांचा हळदीकुंकू समारंभ चालतो. नवी नवरी असेल तर तिचा संक्रांतीचा पहिला सण साजरा होतो. तिच्यासाठी खास हलव्याचे दागिने बनवले जातात. तिला काळी चंद्रकळा नेसविली जाते. तिचे पहिले हळदीकुंकू साजरे होते.
पहिल्या वषी स्त्रियांना हळदीकुंकूच लुटले जाते. जावयाचाही भेटवस्तू देऊन मान करण्याची प्रथा आहे. लहान मुलांचे बोरन्हाणे त्याच्या बरोबरीची मुले बोलावून केले जाते. त्यालाही काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालून सजवले जाते. डोक्मयावर चुरमुरे, बोरे, हलवा असे खाऊ ओततात. आता विविध राज्यातील संक्रांत कशी साजरी होते ते पाहणे मनोरंजक ठरेल. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश येथे लोहळी सण साजरा होतो. त्यादिवशी तेथे शेकोटय़ा पेटवून त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकले जातात. गाणी म्हणतात. हिवाळय़ातील सर्वात थंड दिवसांपैकी हा दिवस असतो. लोहारीदेवीची तेथे पूजा केली जाते.
पूर्व भारतातील बिहार, ओडिशा, बंगालमध्ये याला मकरसंक्रांत म्हणतात. तर आसाममध्ये भोगाली बीहू म्हणतात. पश्चिम भारतात गुजरात, राजस्थानमध्ये याला ‘उतरायण’ म्हणतात. पतंगनो तहवारही म्हणतात. यादिवशी तेथे धान्य, तळलेला मठिया इ. खाद्यपदार्थ दान केले जातात. गहू, बाजरीची खिचडी बनवतात. लहानापासून थोरांपर्यंत सारे पतंग उडवतात. दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू येथे पोंगल सण तीन दिवस साजरा होतो.
यादिवशी घरातील अनावश्यक वस्तुंची होळी पेटवली जाते. त्याभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून नैवेद्य दाखवतात. अशाप्रकारे विविध रंगढंगात हा सण भारतात साजरा होतो. प्रत्येक राज्यात त्याचे वैशिष्टय़ जपले जाते. तरीही विविधतेत एकताही राखली जाते. अशाच सण उत्सवांमुळे आपल्या जीवनातला गोडवा कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. जेणेकरून मने साफ होऊन किल्मिषे दूर होतील..
भास्करस्य यंदा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।