ऑस्ट्रेलियात एकाच कुटुंबातील तीन मुलांना कधीच कोरोनाची लागण झालेली नाही, परंतु चाचणीदरम्यान त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. परंतु या तिन्ही मुलांच्या आईवडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. या मुलांची अनेकदा चाचणी करण्यात आली असता ते वारंवार निगेटिव्ह आढळून आले होते. अखेर संक्रमण न होताच कशाप्रकारे मनुष्याच्या शरीरात विषाणूशी लढणारी अँटीबॉडी विकसित होऊ शकते याचं कोडं उलगडविण्याच्या प्रयत्नात आता वैज्ञानिक आहेत.
नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात प्रसिद्ध एका अध्ययनानुसार कधीच कोरोनाबाधित नसलेले परंतु चाचणीत शरीरात अँटीबॉडी आढळणारी तीन मुले आतापर्यंत सापडली आहेत. लाइला स्वेंको आणि टोनी यांना तीन मुले असून त्यांचे वय अनुक्रमे 6, 7 आणि 9 वर्षे आहे. हे दांपत्य मार्च महिन्यात एका विवाह सोहळय़ात सामील झाल्यावर कोविड पॉझिटिव्ह झाले होते. सर्वकाही सुरळीत असताना अचानक कोरोनाची लागण झाल्याचा संशय वाटल्याने चाचणी केली होती, याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु आम्हा दोघांना स्वतःपेक्षा मुलांची चिंता अधिक होती असे लाइलाने म्हटले आहे.
एकत्र वास्तव्य, तरीही लागण नाही
लाइला आणि टोनी तसेच त्यांची मुले एकत्रच राहत होती. परंतु तिन्ही मुलांची चाचणी निगेटिव्ह आली होती. तिघांचीही अनेकदा चाचणी झाली आणि सर्वच अहवाल निगेटिव्ह आले होते. उपचाराच्या सुमारे एक महिन्याने लाइला आणि टॉमही कोरोना निगेटिव्ह झाले होते.
संशोधनाची गरज
परंतु अंतिम चाचणीदरम्यान मुलांच्या पीसीआर कोरोना चाचणीत शरीरात अँटीबॉडीज असल्याचे दिसून आल्याने डॉक्टर अवाप् झाले. डॉक्टरांनी पुन्हा चाचणी केली असता निष्कर्ष तोच राहिला. संक्रमित न होता मुलांच्या शरीराच्या कोरोनाच्या विरोधात अँटीबॉडीज विकसित झाली होती.









