प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वरात गुरुवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे शहरासह 5 कि.मी चा परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे. तसेच शहरातील मुख्य चौक आणि उपनगरातील संपर्क रस्ते बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आल्यामुळे शहरात सन्नाटा पसरला आहे. दरम्यान खबरदारी म्हणून गुरुवार दि. 16 रात्रीपासून ते दि. 13 मे पर्यंत शहर सीलडाऊन करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहरातील हिरण्यकेशी कारखाना, सोलापूर फाटा व गडहिंग्लज रोड येथून शहरात प्रवेश करण्यात येणाऱया या प्रमुख मार्गावर पोलीस प्रशासनाने गेट उभे करून संपर्कच बंद केला आहे. भाजीपाला विक्री करणारे, हातगाडी, दूध विक्री केंद्रे, किराणा दुकानेही बंद करण्यात आली आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱया नागरिकांना लाठीचा प्रसादही देण्यात येत आहे.
सुमारे 25 जणांना क्वारंटाईन
संकेश्वरात आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा शोध घेण्यात येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तांची पोलीस व आरोग्य विभागाने प्राथमिक तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले आहे. सुमारे 25 जणांना क्वारंटाईन केल्याचे समजते. याबरोबरच कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील 14 जणांनाही तपासणीसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याचेही समजते.
फोन करा अन् साहित्य घरपोच मिळवा
संकेश्वरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे शहर सीलडाऊन करण्यात आले आहे. याकाळात सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंतच्या वेळेत यादी बनविलेल्या दुकानदारांना फोन करा व त्यांच्याकडून रेशन, भाजीपाला मिळवा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी केले आहे.
बापूजी स्कूलवर क्वारंटाईन करण्यास विरोध
हुक्केरी : संकेश्वर-हुक्केरी रस्त्यावर असणाऱया बापूजी स्कूलमध्ये क्वारंटाईन केलेल्यांना ठेवण्यासाठी सोय करण्यात येत आहे. याठिकाणी त्यांची व्यवस्था करू नका, असा विरोध जापूर ग्रामस्थांनी केला असून याविषयीचे निवेदन तहसीलदार अशोक गुराणी यांच्याकडे दिले आहे. यावेळी जापूर व हुक्केरी शहर शांत व कोणतीही बाधा नसताना या क्वारंटाईन लोकांमुळे आपल्यालाही बाधा होईल. तेव्हा बापूजी स्कूलमध्ये क्वारंटाईन लोकांना ठेवू नये. याविषयी हुक्केरी नगरपरिषदेचे नगरसेवक महांतेश नळवार, सदाशिव कऱयापगोळ, राजेश मुन्नोळी, आनंद गंद, जयगौडा पाटील यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे मागणी केली आहे. हुक्केरीचे उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, संकेश्वरचे उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांनी जापूर ग्रामस्थांना समजावून सांगत सरकारच्या आदेशानुसार क्वारंटाईन लोकांना येथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात जाणे चुकीचे आहे. यातील एकही नागरिक बाहेर येणार नाही याची काळजी घेतली आहे, असे सांगितले. परिणामी अद्यापही बापूजी स्कूलवर वातावरण तणावपूर्वक आहे.
(17 एसएनके 2) वैद्याधिकारी उदय कुडची.
घरोघरी तपासणी, 104 जणांची टीम तैनात
आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील प्रत्येक घरा-घराचा संपूर्ण तपशील संकलन करण्यासाठी अंगणवाडी शिक्षिका, सहाय्यिका, आशा कार्यकर्त्यांसह अन्य असे एकूण 104 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीमकडून प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन बाहेरुन कोणी आलेत का?, परिवाराचा प्रमुख कोण, घरांमधील नागरिकांची संख्या किती, 14 दिवसात कोणी बाहेर गावाहून घरी परतले आहे का?, ताप, खोकला, सर्दी, श्वासाचा त्रास यासह अन्य लक्षणे कोणामध्ये आहेत का?, यासह अन्य माहिती संकलन करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उदयकुमार कुडची यांनी दिली.









