प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वर शहरात कोरोनाबाधित आढळल्यानंतर तब्बल 60 दिवस लॉकडाऊन व त्यानंतर सीलडाऊन करण्यात आले होते. 28 मे रोजी मध्यरात्री कंटेन्मेंट झोनचा कालावधी संपुष्टात आला. पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने झोनमध्ये असणारे निर्बंध हटविल्याने जनतेने शुक्रवारी मोकळा श्वास घेतला. यापूर्वी शहरवासियांनी लॉकडाऊन व सीलडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळल्याने आता शासनाने सीलडाऊनचे निर्बंध हटविले आहेत.
शहरात पाच जण कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण शहरच धास्तावून गेले होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बऱयाच जणांना लाठीचा प्रसादही खावा लागला. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व त्यांच्या सहकाऱयांनी कायद्याचा उपयोग केल्याने लॉकडाऊन व सीलडाऊनचे निर्बंध कडक पाळण्यात आले. कोगनोळी यांची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. सध्या क्वारंटाईन असलेल्या सर्वांचेच स्वॅब निगेटिव्ह असल्याने प्रत्येकांना स्वगृही पाठवून बाधामुक्त शहराची घोषणा पोलीस, आरोग्य व नगरपरिषद प्रशासनाने केली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मोकळय़ापणाने वावरणे शक्य झाले आहे.
उताविळपणा नको, संयम राखा
संपूर्ण संकेश्वर लॉकडाऊनमधून मुक्त झाले आहे. पण, आपणही या मुक्तीचा अधिक गाजावाजा न करता उताविळ होऊ नका, संयम राखून प्रत्येक दिवस सुरक्षित घालवावा, आपले शरीर रोगमुक्त राखण्यासाठी प्रयत्न करा, तरच आगामीकाळ सुखाचा जाणार आहे. अन्यथा विषाणूचा धोका पेंव्हाही होऊ शकतो, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले.









