लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या पगारातून गरिबांना वाटले धान्य-भाजीपाला
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाशी लढताना प्रत्येकाची ससेहोलपट होत आहे. गरीब व मध्यमवर्गीयांचे तर खाण्यापिण्याचेही वांदे होत आहेत. कोरोना थोपविण्यासाठी 55 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कामधंदेही बंद पडले. अशा परिस्थितीत अनेक संस्था-संघटना गरिबांच्या मदतीला धावल्या. संकेश्वर येथील एका पोलीस हवालदाराने स्वतःच्या पगारातून गरीब व मजूर कुटुंबीयांना धान्य व भाजीपाला वाटप करून इतरांसमोर आदर्श घालून दिला आहे.
नवी दिल्ली येथील निजामुद्दिन मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत भाग घेऊन संकेश्वरला परतलेल्या व्यक्तीमुळे संकेश्वरातही कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गाव सीलडाऊन केले होते. सरकारकडून गरिबांना धान्यवाटप सुरू होते. मात्र, अनेक जण यापासूनही वंचित होते. हे लक्षात येताच हवालदार बी. के. नांगनुरे यांनी गरजूंना धान्यवाटपाचा निर्णय घेतला.
संकेश्वर पोलीस स्थानकात कार्यरत असणाऱया या हवालदाराने आपल्या दोन महिन्यांच्या पगारातून जीवनावश्यक वस्तू मागवल्या व त्या गरजूंना वाटण्यास सुरुवात केली. खास करून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यामुळे तेथील नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. अशा भागातील घराघरात जाऊन त्यांनी भाजीपाला वाटप केला आहे.
संकेश्वर पोलीस स्थानकासमोर अडचण घेऊन येणाऱया गरजूंना धान्याचे किट वाटून त्यांना धीर देण्याचे औदार्य या हवालदाराने दाखविले आहे. पोलीस म्हटले की समाजात नेहमी त्याच्याकडे संशयाने पाहण्याची प्रथा आहे. कारण नागरिकांचा अनुभवच तसा असतो. लॉकडाऊच्या काळात पोलीस व अधिकाऱयांनी बजावलेल्या सेवाकार्यामुळे नागरिकांच्या मनातील ही दुराव्याची भावना मिटत आहे.
कोरोना बंदोबस्त करतानाच गरजूंना आपल्या पगारातून मदत करणाऱया पोलिसांची संख्याही वाढती आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस दलाबद्दल आपुलकीची भावना निर्माण होत आहे. केवळ धान्यवाटप करून स्वस्थ न बसता दीडशे ते दोनशे स्वयंसेवकांची एक फळी उभारून परिसरात जागृतीचे कामही बी. के. नांगनुरे यांनी हाती घेतले आहे.
300 हून अधिक कुटुंबांना मदत
हवालदार बी. के. नांगनुरे यांनी लॉकडाऊनच्या काळात 300 हून अधिक कुटुंबांना धान्यवाटप केले आहे तर सीलडाऊन असलेल्या गल्ल्यांमध्ये भाजीवाटपचे कामही त्यांनी केले आहे. बंदोबस्तासाठी दिवसरात्र फिरताना अनेकांच्या हालअपेष्टा त्यांनी स्वतः पाहिल्या आणि त्यांना राहवले नाही म्हणून आपल्या पगारातून धान्य खरेदी करून ते गरजूंना पोहोचविण्याची सेवा त्यांनी सुरू केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे..









