प्रतिनिधी/ संकेश्वर
बहुचर्चित असणाऱया संकेश्वर नगरपरिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 27 रोजी होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळय़ात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नगराध्यक्ष पदासाठी कत्ती बंधूंचा कौल कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता असली तरी सध्याची परिस्थिती पाहता नगरसेविका सीमा हतनुरी यांचे नगराध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाल्याचे समजते. मात्र उपनगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच लागली आहे.
उपनगराध्यक्षपदाचे आरक्षण सामान्य असल्यामुळे कोणत्याही वर्गाचा उमेदवार या पदाचा दावेदार होऊ शकतो. तथापी कत्ती बंधूकडे सत्तेची सुत्रे एकवटली असलीतरी इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे उमेदवार निवडताना नाराजांची मनधरणी करण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या दोन्ही पदाचा सत्ताकालावधी 30 महिन्यासाठी आहे. नंतरच्या कालावधीसाठी घोषित होणाऱया आरक्षणावरच पुढील निर्णय अवलंबून असणार आहे.
ऑगस्ट 2018 मध्ये पार पडलेली निवडणूकीनंतर तब्बल 25 महिन्यांनी आरक्षणाच्या वादावर पडदा पडला व कोणत्याही परिस्थितीत 10 नोव्हेंबरपूर्वी पदाधिकारी निवडणूका झाल्याच पाहिजेत, असा ठाम निर्णय घेतला गेल्याने या निवडणूकींना गती प्राप्त झाली आहे. गेल्या आठवडय़ात या निवडणुकांना पून्हा स्थगितीचा आदेश मिळाल्याने पुन्हा एकदा राज्यभर नाराजीचे तीव्र पडसाद उमटले. पण स्थगिती उठल्यानंतर आता नियोजित तारखेनुसार निवडणूक पार पडणार असल्याने नूतन नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सुनिल पर्वतराव, प्रमोद होसमनी, सुचित्रा परिट, मनोरमा सुगते या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. कत्ती बंधूनी यापैकी कोणाच्या नावावर ठाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून इच्छुकांनी समर्थकांमार्फत कत्ती बंधूकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. तथापि अपक्ष उमेदवार अजित करजगींना उपनगराध्यक्षपद द्या, अशीही मागणी जोर धरली आहे. एकूणच उपनगराध्यक्ष पदालाही महत्त्व वाढले आहे.









