प्रतिनिधी/ संकेश्वर
येथील इंदिरानगरात घरफोडी करून चोरटय़ांनी 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड, तांब्याची भांडी, चांदी व इतर संसारोपयोगी साहित्य लंपास केले. मुलीच्या लग्न कार्यासाठी साठविण्यात आलेली रक्कम चोरटय़ांनी लांबविल्याने तब्बूसुम बशीर भाई यांच्यावर संकट ओढावले आहे. इंदिरानगर येथील तब्बूसुम या कार्यक्रमानिमित्त राधानगरी येथे कुटुंबियासह गेल्या होत्या. याचा लाभ घेत चोरटय़ांनी घरफोडी करताना 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड आणि किंमती ऐवज लांबविला. राधानगरीहून परतल्यानंतर घरातील साहित्य विस्कटलेले आढळून आले. यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. याबरोबरच तब्बूसुम यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या दोन बंद घरांनाही चोरटय़ांनी लक्ष करताना तेथून जीवनावश्यक वस्तू चोरुन नेल्या आहेत. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. तब्बूसुम यांच्या मुलीच्या लग्नासाठी जमविलेली रोकड लांबविण्याबरोबरच चोरीस गेलेल्या बॅगेमध्ये मुलीचे कॉलेज परीक्षेची प्रवेशपत्रिकाही होती.









