प्रतिनिधी/ संकेश्वर
गेल्या महिन्याभरापासून निपाणी, अथणी तालुक्यात चोरीसत्र सुरुच आहे. आता चोरटय़ांनी आपला मोर्चा संकेश्वर भागात वळविला असून मंगळवारी दिवसाढवळय़ा येथील बीएसएनएल कार्यालयानजीकचे घर फोडले होते. या घटनेचा उलगडा कुटुंबीय घरी परतल्यानंतर लक्षात आले. या घटनेत चोरटय़ांनी रोकडसह सोन्या, चांदीचे दागिने असा सुमारे 6 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बीएसएनएल कार्यालयीनजीकच्या रहिवासी दमयंती विठ्ठल कंग्राळकर या गावी गेल्या होत्या. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. मंगळवारी चोरटय़ांनी त्यांचे घर बंद असल्याचे पाहून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर तिजोरीतील 155 ग्रॅम सोने, चांदीचे दागिने व रोख 10 हजार रुपये असा एकूण 6 लाख 20 हजाराचा ऐवज लांबविला.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी कंग्राळकर या घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता तिजोरीतील साहित्य विस्कटल्याचे दिसले. तिजोरीतील रोख रक्कम व दागिने लांबविल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी तत्काळ याची माहिती संकेश्वर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी चोरटय़ांचा शोध चालविला असून तपासासाठी कर्नाटक व महाराष्ट्राच्या विविध भागात पथके रवाना केली आहेत. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे.









