प्रतिनिधी/ संकेश्वर
शहरातील 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर निडसोशी रोड परिसर रेड झोन जाहीर केल्याने, त्यावर आरोग्य खात्यासह पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. शिवाय शहरात येणारे सर्व 10 प्रमुख मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
यापूर्वी शहरात सकाळी 2 तास किराणा दुकाने उघडण्याची मुभा दिली होती. मात्र बाजारात नागरिक सामाजिक अंतर ठेवण्याकडे दुर्लक्ष करीत गर्दी करु लागल्याने पोलिसांकडून पुन्हा निर्बंध घालण्यात आले. तसेच नागरिकांना किराणा साहित्य घरपोच मिळविण्यासाठी व्यापारी वर्गाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तर केवळ अत्यावश्यक सेवेत येणाऱया दूध, औषध दुकाने, बँका शहरात सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
निडसोशी रोड परिसरातील कोरोनाबाधित क्षेत्र सील करण्यात आले असून बाहेरील लोकांना याठिकाणी ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोबत भागातील नागरिकांवर आरोग्य खाते नजर ठेवून आहे. या भागात आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून सर्व्हेचे काम सुरू असून त्यात प्रत्येक घरातील स्त्री-पुरुष सदस्य संख्या, कुटुंब प्रमुखांचा मोबाईल क्रमांक, घरात कोणी आजारी आहेत का? याची माहिती संकलित केली जात आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राहण्याची सोय वेगवेगळय़ा लॉजमध्ये करण्यात आली असून त्यांच्या आरोग्याची रोज तपासणी केली जात आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा पहारा ठेवला आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरापासून 200 मीटर क्षेत्र रेड झोन घोषित केल्याने येथील रस्ते बॅरिकेड्स लावून बंद ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांच्या थर्मल स्क्रिनिंग तपासणीच्या कामास वेग आला आहे. शिवाय होमक्वारंटाईन केलेल्यांच्या प्रकृतीची आरोग्य खात्याकडून चौकशी केली जात आहे. संकेश्वर येथे घेतलेल्या अन्य काही व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी असून, त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
पॅरासिटॅमोल घेणाऱयांवर लक्ष
काहीजण अंगातील ताप, कणकण कमी करण्यासाठी डॉक्टरांकडे न जाता पॅरासिटॅमोलची गोळी खातात. मात्र काही कोरोना रुग्णदेखील या गोळीचा वापर करीत आपले दुखणे लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार औषध दुकानदारास पॅरासिटॅमोल गोळी खरेदी करणाऱयाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, सोबत डॉक्टरचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे.









