संग्राम काटकर / कोल्हापूर
मुलगा-मुलगी दिव्यांग आहे. विवाहाचे वयही झाले आहे. पण धडधाकट मुलगा दिव्यांग मुलीशी आणि धडधाकट मुलगी दिव्यांग मुलाशी विवाह करेलच असे नाही. त्यामुळे दिव्यांग मुला-मुलींचाच विवाह करावा लागतो. दिव्यांगत्व जास्त असल्यास मुलगा-मुलगी पाहणे कार्यक्रमात शारीरिकदृष्ट्या अडचण येते. आता असे होऊ नये म्हणून मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे व औरंगाबाद जिल्हा केंद्राने पुढाकार घेतला आहे. शिवाय त्यांनी दिव्यांग वधुवरांची माहिती फोटोसह पहायला देणारे shttps://divyangvivah.org/register.html हे संकेतस्थळही बनवले आहे. सध्या त्यावर वधुवरांची माहिती अपलोड केली जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने गेल्या काही महिन्यांपूर्वी पुणे आणि औरंगाबादेत अस्थिव्यंग, अंध व कर्णबधीर वधु-वर मेळावे आयोजित केले. यातून अनेकांचे विवाह जुळले. उर्वरीत दिव्यांग वधु-वरांचेही विवाह जुळणे सोपे व्हावे, इच्छूकांना चटकन मुला-मुलींची माहिती पाहता यावी, यासाठी संकेतस्थळ तयार करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार संकेतस्थळही केले. यामध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे व औरंगाबादेसह मराठवाड्यातील दिव्यांग वधु-वरांची माहिती जशी मिळत गेली तशी ती अपलोड करण्यास सुरुवात केली. आजवर 700 हून अधिक वधूवरांची माहिती अपलोड केली आहे. यामध्ये वधू-वरांच्या फोटोसह संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारिख, रक्तगट, उंची, रंग, शिक्षण, दिव्यांग प्रकार व टक्केवारी, नोकरी, उत्पन्न, कुटुंब, अपेक्षा, जातीची अट आहे-नाही अशा माहितीचा समावेश आहे.
अगदी अलीकडेच कोल्हापूर जिह्यातील सर्व दिव्यांगांनाही संकेतस्थळाची माहिती कळावी, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व अपंग हक्क विकास मंच यांच्या वतीने दिव्यांग वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये जिह्यातून 130 वधु-वर सहभागी झाली होते. या मेळाव्यातील पुणे, औरंगाबादेसह विविध ठिकाणी झालेल्या मेळाव्यातील सहभागी होऊन विवाह जुळलेल्या वधु-वरांचे विवाह जानेवारी महिन्यात लावले जाणार आहेत. उर्वरीत वधु-वरांची माहिती नंतर संकेतस्थळावर अपलोड केली जात आहे. हे संकेतस्थळ लवकरात लवकर सर्वांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रयत्नशिल आहे. जेव्हा केव्हा संकेतस्थळ खुले होईल, तेव्हापासून मात्र दिव्यांगांचे विवाह जुळण्यातील अडसड गळून पडण्यात मदत होणार आहे.
कोल्हापूर जिह्यातील विवाह इच्छूक अस्थिव्यंग, अंध व कर्णबधीर दिव्यांगांना संकेतस्थळावर आपली माहिती अपलोड करायची आहे, त्यांनी कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती शासकीय इमारतीतील कोल्हापूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. येताना सोबत रंगीत फोटो, बायोडाटा, अपंगत्वाचा दाखला, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आदी कागदपत्रे सोबत आणावे, असे आवाहन केंद्र सन्मवयक स्वाती गोखले यांनी केले आहे.