सरत्या वर्षाचा आढावा घेत, नवीन वर्षाला नव्या उमेदीने सामोरे जाण्याचा ‘संकल्प’ आपल्या सर्वांनाच उभारी देणारा असणार आहे. 2020 मधील कोरोनाचे संक्रमण आपल्याला बरेच काही शिकवून गेले आहे. विशेषत: आरोग्याच्या बाबतीत. साध्या-साध्या आरोग्यदायी सवयींपासून ते कोविड लसीच्या नियोजनापर्यंतचा प्रवास आपल्याला भविष्यातील महामारीच्या स्थितीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. कुपोषण, रक्तक्षय यासारख्या काही महत्त्वाच्या आरोग्याच्या प्रश्नांच्याबाबतीत आपण अजूनही समाधानकारक वाटचाल केलेली नाही. अशा स्थितीत कोविड-19 सारखी संक्रमणे आपल्याला पुन्हा दोन पावले मागे नेऊन ठेवतात. वर्ष संपता संपता काही अहवालातून आरोग्य स्थितीबाबत काही गंभीर निष्कर्ष समोर आलेले आहेत. त्याबाबत प्रतिबंधात्मक स्वरुपात काम करून शाश्वत विकासांच्या उद्दिष्टांची (एस डीजी) वाटचाल आपल्याला सहजसोपी करता येण्याजोगी आहे. त्यासाठी ‘आरोग्य साक्षरता’ हा आरोग्य सेवांचा पाया राहणे आवश्यक ठरेल.
‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5’ द्वारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालामधून पाच वर्षांच्या आतील बालकांमधील कुपोषण वाढीस लागल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे बालक, महिला आणि पुरुष यांच्यामधील ‘रक्तक्षया’चे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे कुपोषणाची समस्या आहे तर दुसरीकडे मुंबई, नागपूरसारख्या शहरांमध्ये बालकांमधील ‘स्थूलते’चे प्रमाण वाढत असल्याची नोंद याच अहवालात ठळकपणे मांडली गेली आहे. बालकांमधील स्थूलतेचे प्रमाण हे पूर्वीपेक्षा सरासरी चार टक्क्मयांनी वाढले असल्याचे दिसून येते. कोरोना संक्रमण काळात अंगणवाडी, शाळा बंद झाल्याने कुपोषण, रक्तक्षय यासारख्या अनारोग्याच्या स्थितीत वाढ होण्याची शक्मयता अधिक संभवते. या काळात अंगणवाडीच्या लाभधारकांना कोरडा शिधा दिला जात आहे. कुटुंबाकडे हा शिधा दिल्यानंतर तो बालकांपर्यंत पोचेलच याची खात्री देता येत नाही. कोरोना संक्रमणपूर्वी अंगणवाडीत येणाऱया बालकांना अन्न शिजवून दिले जात होते. तेव्हा ते थेट लाभार्थीला मिळत होते. बालके पोषण आहारापासून वंचित होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक आहे, ‘मायक्रो मार्केंटिग’. आज अगदी खेडोपाडय़ातही नामांकित कंपन्यांचे नूडल्स, चॉकलेट-बिस्किट्स, कुरकुरे आदि खाद्य उत्पादने छोटय़ा वेष्टणांमध्ये उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी आठवडा बाजारात मिळणारी शेव-रेवडी, चिक्की, मटकी-भेळ यासारखे पदार्थ तुलनेने कितीतरी पौष्टिक होते. घराघरात टी.व्ही., स्मार्ट फोन पोहोचल्याने या वस्तूंच्या जाहिरातींची भुरळ बालकांसोबत पालकांनाही पडलेली आहे. ग्रामीण भाग अथवा शहरी झोपडपट्टय़ांमधून अनेक ठिकाणी हीच उत्पादने बनावटी स्वरुपातही विकली जातात. आकृष्ट करणाऱया या खाद्य उत्पादनांची शहानिशा करण्याचे भान, ज्ञान आणि समज अनेक शिक्षित पालकांना नसते. स्वस्तात आणि स्थानिक ठिकाणी सहज उपलब्ध होणारे हे खाद्यपदार्थ कित्येक वेळा मुलांचे आरोग्य धोक्मयात आणतात. टाळेबंदीच्या विविध टप्प्यात गाडीवर खाद्य पदार्थ विकणाऱया अनेकांवर संक्रांत ओढवली हे दुर्दैवी. मात्र याच काळात पचन संस्थेशी निगडित अतिसार, काविळ यासारख्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हात धुण्याची सवय, बाहेरील खाद्य पदार्थांवर आलेले निर्बंध आणि पचनसंस्थेच्या विकारात झालेली घट यांचा सहसंबंध येथे नाकारता येणार नाही.
ग्रामीण वा शहरी भागातील झोपडपट्टी येथे आरोग्य अज्ञान, गरीबी यामुळे मुलांमधील कुपोषण असेल वा प्रौढांमधील रक्तक्षयासारखी आरोग्य स्थिती हे एकवेळ समजण्याजोगे आहे. परंतु शहरी भागातील शिक्षित, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोकांमधील आरोग्य निरक्षरता लपून राहिलेली नाही. मुलांमधील वाढणारे स्थूलतेचे प्रमाण हे त्याचेच द्योतक आहे. खेळ, छंद म्हणजे वेळ वाया घालवणे वा अभ्यासाकडे दुर्लक्ष अशा समजुतीने पालक वावरतात. त्यातच ‘ऑनलॉईन’ शिक्षणाची भर पडल्यामुळे मुलांच्या शारीरिक हालचालींवर अधिक मर्यादा आलेल्या आहेत. आहारातील पोषण मूल्यांकडे दुर्लक्ष, विविध खाद्य पदार्थांच्या जाहिरातींचा प्रभाव, नुसते रिकामे बसले असताना वा टी.व्ही, मोबईल समोर असताना तोंड-हात चालू ठेवण्याची सवय.
अनारोग्यदायी सवयी भविष्यात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या असांसर्गिक आजारांच्या रुग्णात भर घालणाऱया ठरणार आहेत. दुसरा मुद्दा प्रतिकारशक्तीचा. मुले खेळलीच नाहीत, शारीरिकदृष्टय़ा दमली नाहीत तर त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती येणार कुठून? गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत विविध वाहिन्यांवर ब्रेकमध्ये येणाऱया जवळ-जवळ प्रत्येक जाहिरातीमधून केवळ ‘इम्युनिटी बढाने के लिए’ आणि ‘जर्म फ्री’ हे दोनच शब्द आपल्या कानांवर पडत आहेत. कालांतराने आपला इतका ब्रेनवॉश होईल की या दोन गोष्टी नसल्या तर आपले काही खरे नाही, असे वाटून भविष्यात अनेक मानसिक समस्यांकडेही आपली वाटचाल होण्याची शक्मयता आहे. शहरी भागातील आरोग्य निरक्षरता दर्शविणारे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘मुहूर्तावर सिझेरियन प्रसूती’ करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ. मुंबई आणि उपनगरांमध्ये सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमधून मुहूर्तावर सिझेरियन प्रसूती करण्याकडे कल वाढल्याचे ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5’ मधून समोर आले आहे. अशा गोष्टींचे लोण मध्यमवर्ग, दारिद्रय़ रेषेवर असणारा वर्ग वा ग्रामीण भागात पोचायला वेळ लागत नाही. यातून नफेखोरी, वैद्यकीय सेवेतील कुप्रथांना चालनाच दिली जाईल. इथेही ‘माऊथ पब्लिसिटी’ लाभार्थ्यास बरोबर आपल्या जाळय़ात ओढताना दिसून येते. ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5’ मधून ‘माता-बाल’ आरोग्याविषयीचे अनेक प्रश्न आपल्यासमोर आलेले आहेत. या व्यतिरिक्त असांसर्गिक आजारांबाबतही आपल्याकडे बरेच अज्ञान आहे. काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे खोटे सांगत एका महिलेकडून चार वर्षात जवळ-जवळ दीड कोटी रु. उपचारांसाठी घेतल्याची एक बातमी वृत्तवाहिनीवर झळकत होती. या पद्धतीच्या शिक्षित, शहरी नागरिकांच्या फसवणुकीच्या घटनाही ‘आरोग्य साक्षरेते’ विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
80 आणि 90 च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये ‘आरोग्य चळवळी’चे अनेक प्रयोग झाले. डॉ. राणी बंग-अभय बंग (गडचिरोली), डॉ. स्मिता कोल्हे-रविंद्र कोल्हे (मेळघाट), डॉ. मंदाकिनी आमटे-प्रकाश आमटे (हेमलकसा), डॉ. शुभदा देशमुख-सतीश गोगुलवार (गडचिरोली), डॉ. मेबेल-रजनीकांत आरोळे (जामखेड), डॉ. शुभांगी अंहकारी-शशिकांत अंहकारी (अणदूर, तुळजापूर) आणि अलीकडील डॉ. नुपुर पाटील-संग्राम पाटील (एरंडोल) या मंडळींनी सर्वंकष ‘आरोग्या’बाबत ग्रामीण भागात यशस्वी प्रयोग केलेले आहेत. आधुनिक शास्त्राला पारंपरिक ज्ञानाची जोड देत आरोग्यासोबत सेंद्रीय शेती, वन संरक्षण, पशुपालन, औषधी वनस्पती, पारंपरिक बीजांचे जतन, रोपवाटिका, वैदु-सुईणींना प्रशिक्षण असे उपक्रम राबवत ‘समग्र आरोग्या’चा विचार केलेला दिसून येतो. कुपोषण, न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यु हे अविकसित, दुर्गम भागातील प्रश्न स्थानिक संसाधनांचा उपयोग करून अत्यंत कमी खर्चात सोडवता येऊ शकतात, या त्यांच्या प्रयोगाचे अनेक देशांमध्ये अनुकरण होत आहे. त्यांनी दिलेल्या ‘आरोग्य साक्षरते’च्या कामाचा वसा, नवीन वर्षात संकल्प करून आपण सर्वजण पुढे नेऊयात.
डॉ. स्वाती अमराळे-जाधव








