प्रतिनिधी/ पणजी
कोरोनामुळे दूधाचे दर सर्वच राज्यामध्ये उतरले आहेत. दूधाला मागणी नसल्याने दूध शेतामध्ये फेकून दिले जात आहे. अशावेळी गोवा डेअरी मात्र महाग दरात दूध खरेदी करीत आहे. अशा संकटाच्या स्थितीतही गोवा डेअरीमध्ये लूट सुरू आहे, असा आरोप गोवा डेअरीचे माजी चेअरमन राजेश फळदेसाई यांनी केला आहे.
आज कोरोनामुळे सर्वत्र लोकांचे हाल सुरू झाले आहेत. लोक अडचणीत आले आहेत अशावेळी गोवा डेअरीने स्वस्त दरात दूध उपलब्ध करणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्रात दूधाचे दर प्रचंड उतरले आहेत 25 ते 26 रूपये प्रती लिटर दराने दूध मिळत आहे. अशावेळी कमी दरात दूध खरेदी करून ते स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करायला हवे. मात्र गोवा डेअरी महाराष्ट्रात दर उतरले असताना 12 ते 13 रूपये जास्त दराने दूध विकत घेत आहे. सहकार संस्थांनी खरे म्हणजे यात लक्ष घालायला हवे. एवढी वाईट स्थिती असताना गोवा डेअरीची ही कृती अत्यंत लाजिरवाणी आहे.
कमी दरात दूध खरेदी करून कमी नफा ठेवत लोकांना दूध उपलब्ध करणे शक्य आहे. पण डेअरीने अवलंबिलेली भूमिका घातक असल्याचा आरोप फळदेसाई यांनी केला आहे. 25 ते 26 रूपये प्रति लिटर दराने दूध उपलब्ध करण्याची आपली तयारी आहे. आपण पुरवठादारांशी बोलणीही केली आहे असेही फळदेसाई यांनी सांगितले. कर्नाटकातील एका प्रकल्पातून दूध आणले जाते. 2017 मध्ये गोवा डेअरीच्या चेअरमननी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली होती. तेथे व्यवस्थित स्वच्छता राखली जात नसल्याने या प्रकल्पाचे दूध नाकारले होते. आता त्याच प्रकल्पातून वाढीव दराने दूध आणले जात आहे. सध्या 38 रूपयापेक्षा जास्त दराने गोवा डेअरी दूध विकत घेत आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
गुरांसाठी लागणाऱया मका खाद्याच्या खरेदीसाठी प्रस्ताव ठेवला असून हा प्रस्तावही 5 ते 6 रूपये जास्त आहे. मका खाद्य 13.50 पैसे दराने उपलब्ध होऊ शकतो. आपण स्वतः उपलब्ध करून द्यायला तयार असल्याचे ते म्हणाले. गोवा डेअरीतून ज्या अधिकाऱयाला निलंबित केले आहे तो अधिकारी सध्या गोवा डेअरीचे वाहन घेऊन फिरत आहे. गोकुळचे बटर 260 रूपये दराने उपलब्ध असताना गोवा डेअरी मात्र जास्त दराने बटर खरेदी करत आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन ही लूट थांबवावी, असेही फळदेसाई म्हणाले.









