महाराष्ट्र, मध्य, वायव्य, उत्तर भारतासह सबंध देशाला मागच्या दोन ते चार दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला आहे. त्यामुळे भारतातील अनेक राज्यांची व तेथील शहरांची अवस्था एखाद्या भट्टीसारखी झाल्याचे दिसून येते. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने प्रामुख्याने उन्हाळय़ाचे मानले जातात. यातील एप्रिल व मे महिन्यात दरवर्षीच कडक उन्हाळा अनुभवावयास मिळत असतो. किंबहुना यंदा वैशाखाआधी ऐन चैत्रातच उन्हाळय़ाने गाठलेले टोक पाहता पुढचे दोन ते तीन आठवडे आणखी कसोटीचे असू शकतात. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या उत्तर मैदानी भागात, वायव्य तसेच मध्य भारतात उष्णतेची लाट पसरली असून, गुरुवारपासून तिची तीव्रता अधिक वाढल्याचे पहायला मिळते. पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, झारखंड आदी भागात कमाल तापमान 43 ते 46 अंश सेल्सिअसदरम्यान, तर जम्मू काश्मीर, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य महाराष्ट्रात 40 ते 43 अंशापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. प्रयागराजमध्ये 45 वर तापमान नोंदविले जाणे काय किंवा विदर्भातील चंद्रपुरात 46.4 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचणे काय, हा हवामानाने दिलेला इशाराच म्हणता येईल. विदर्भात तापमान 48 ते 49 वर गेल्याची उदाहरणे सापडतील. किंबहुना, हे वातावरण सतत टिकून राहणे, दिवसा व रात्रीही असहय़ उकाडा जाणवणे, या बाबी चिंता वाढविणाऱया बाबी म्हणता येतील. पुढचे काही दिवस राज्याच्या सात ते आठ राज्यांमध्ये उष्णतेची ही लाट कायम राहण्याची चिन्हे आहेत. विदर्भात ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला असून, तेथील सूर्याचा प्रकोप आणखी वाढण्याचा अदमास आहे. त्यामुळे आणखी काही दिवस उष्णतेपासून काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. मागच्या काही दिवसांत उष्माघातामुळे काही नागरिकांना प्राण गमवावा लागल्याचीही उदाहरणे आहेत. संभाव्य अंदाज पाहता राज्यासह देशातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. मुख्यतः सकाळी अकरा ते सायंकाळ पाच या वेळेत कामाशिवाय बाहेर पडणे टाळायला हवे. त्याचबरोबर अतिश्रमाच्या कामांनाही फाटा द्यायला हवा. या काळात भरपूर पाणी पिण्यासह सरबत, ताक वा तत्सम थंड पेयांचे सेवन करावे, सुती, हलके कपडे वापरावेत, हलका आहार घ्यावा, असा सल्ला आरोग्यतज्ञांकडून देण्यात आला आहे. त्याचे तंतोतंत पालन व्हावे. चढ-उतार हे हवामानाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. असे असले, तरी मागच्या काही वर्षांपासून देशाला अर्थात जगाला बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. ढगफुटी, अतिवृष्टी, गारपीट, थंडीची तीव्र लाट, उष्मातिरेक, दुष्काळ यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते आहे. या साऱयाचा फटका शेती, पीक उत्पादनासह अनेकविध घटकांवर पडताना दिसतो. यंदाच्या उन्हाळय़ाचा विचार करता मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. शहरे असोत वा गावे. पाण्यासाठीची वणवण चुकलेली नाही. हे चित्र भयावहच. जलनियोजनाचा अभाव, पाण्याचा अपव्यय, गळती, तीव्र उन्हाळय़ामुळे धरणसाठय़ातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन, भूगर्भातील खालावलेला जलसाठा असे कितीतरी घटक याच्या केंद्रस्थानी आहेत. स्वाभाविकच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ अनेक शहरांवर, गावांवर आली असून, वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा कसा करावा, हा प्रश्नही बिकट होत आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी अवस्था झाली आहे. या संकटापासून वाचण्याकरिता पाण्याचे सुयोग्य नियोजन क्रमप्राप्त ठरते. त्यातून उन्हाळा सुसहय़ होऊ शकेल. नागरिकांनीही पावसाळा व हिवाळय़ातील पाण्याचा अनिर्बंध वापर टाळत पाणीबचतीचा मंत्र जपला, तर त्यातूनही काही सकारात्मक गोष्टी घडतील. ग्लोबल वार्मिंगचे भयंकर परिणाम मागच्या काही वर्षांत पुढे येताना दिसत आहेत. उष्णतेच्या लाटा, हाही त्याचा परिपाक मानता येईल. जंगलांची अनिर्बंध तोड, वाढते नागरीकरण, रस्त्यांची कामे व या ना त्या माध्यमातून होणारा पर्यावरणाचा ऱहास हाही याला कारणीभूत असल्याचे दिसते. सिमेंटच्या जंगलांसोबत प्रदूषणाचा आलेख असाच वाढत राहिला, तर भविष्यात उष्णतेच्या त्सुनामीलाच आपल्याला सामोरे जावे लागेल, हे वेगळे सांगायला नको. हे पाहता पर्यावरणाशी तडजोड न करता विकासाचे चाक कसे पुढे नेता येईल, यावरच भर हवा. देशभर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली असून, 16 राज्यांमध्ये 10 तासांपर्यंत भारनियमन केले जात आहे. 165 वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी 56 प्रकल्पांमध्ये त्यांच्या कोळसा साठवणुकीच्या क्षमतेच्या फक्त 10 टक्के कोळसा शिल्लक असून, 26 वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ 5 टक्के कोळसा शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय वीज प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. हे अभूतपूर्व कोळसा संकटच म्हणता येईल. परिणामी 650 वर प्रवासी रेल्वे रद्द करीत कोळसा वाहतुकीस प्राधान्य देण्यात आले आहे. हे तात्कालिक परिस्थितीत योग्यच होय. मात्र, कोळशाचा इतका तुटवडा निर्माण होईपर्यंत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत का, असा प्रश्न उत्पन्न होतो. उष्णतेची लाट, विजेची वाढती मागणी, कोळशाचा पुरवठा हे तिन्ही घटक परस्परांशी संबंधित आहेत. कोळशाचा पुरेसा पुरवठा होत नसेल, तर वीज उत्पादनावर त्याचा परिणाम होणारच. आज तीच स्थिती आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीजसंकट दूर करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे. तर हे राष्ट्रीय संकट असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. दुसऱया बाजूला केंद्रीय रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयांतील असमन्वय कोळसा टंचाईला कारणीभूत असल्याचे अखिल भारतीय विद्युत अभियंता फेडरेशनने म्हटले आहे. तर याला राज्येच कारणीभूत असल्याचे केंद्र म्हणते. या आरोप-प्रत्यारोपाऐवजी कोळशाचा पर्यायाने विजेचा प्रश्न मार्गी लावला जावा, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Previous Article160 भाषांमध्ये झळकणार ‘अवतार ः द वे ऑफ वॉटर’
Next Article शिल्पा शिंदेला करायचा नाही विवाह
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








