काँग्रेस, फॉरवर्डने उपस्थित राहणे टाळले
प्रतिनिधी/ पणजी
गोवा मुक्तीचे षष्टय़ब्दी वर्ष साजरे करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीस काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे, फ्रान्सिस सार्दीन, विजय सरदेसाई यांनी बैठकीस उपस्थित राहणे टाळले.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाने यापूर्वीच या सोहळ्यावर बहिष्कार घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना सरकार या सोहळ्यावर सुमारे 100 कोटी रुपये खर्च करण्यास तयार झाले आहे. सरकार एका बाजूने कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी दरमहा कर्ज घेत आहे आणि दुसऱया बाजूने अशा सोहळ्यांवर जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, हे पूर्ण निषेधार्ह आहे. त्यापेक्षा या पैशातून कोरोनाकाळात हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आलेल्या रिक्षाचालक, दुचाकी पायलट, टॅक्सीमालक, बसमालक यांना मदत करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे.









