अमेरिकेतील संशोधकांचे महत्त्वपूर्ण यश, लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार, तंत्रज्ञान सुलभ व सुरक्षित
अमेरिकेतील संशोधकांनी श्वासावाटे कोरोनाची लस घेता येईल, असे नवे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला आहे. यामुळे कोणालाही लस घेणे अतिशय सुलभ होणार असून हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा आहे. या तंत्रज्ञानाची माहिती ‘मेड’ वैद्यकीय विषयाला वाहिलेल्या नियतकालिकात देण्यात आली आहे.
इंजेक्शनद्वारे लस घेण्यापेक्षा ती श्वसनाच्या माध्यमातून घेणे अधिक सुलभ आणि निर्धोक होणार आहे. तसेच यातनाविहीन पद्धतीने लस शरीरात जाणार असल्याने आबालवृद्धांसह सर्वांनाच ते सोयीचे होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हे तंत्रज्ञान श्वसन यंत्रणेला होणाऱया कोणत्याही विकारावरील लसीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
त्वरित परिणाम

इंजेक्शनद्वारे टोचून घेतलेल्या लसीचा परिणाम दिसून येण्यास काही वेळ जावा लागतो. तसेच कित्येकांना थेट रक्तात लस मिसळल्याने ऍलर्जीचा त्रास होतो. काही रुग्णांमध्ये तीव्र रिऍक्शन निर्माण झाल्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अंगावर पुरळ उठणे, ताप येणे, अस्वस्थ वाटणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे इत्यादी समस्या जाणवत असल्याने अनेक जण लस टोचून घेण्याचे भीतीपोटी टाळतात, असे दिसून आले आहे. तथापि, श्वसनावाटे घेतल्या जाणाऱया लसीमुळे हे दुष्परिणाम बऱयाच प्रमाणात टाळता येतात. तसेच एखाद्या रुग्णाला कोरोना लसीची ऍलर्जी असेल तर तेही पूर्ण लस शरीरात जाण्यापूर्वीच समजून येते. असे अनेक फायदे श्वसनावाटे घेतल्या जाणाऱया लसीचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ही लस शरीरात पोहोचताच आपले कार्य त्वरित सुरू करते. त्यामुळे तिचा परिणामही अधिक चांगला असतो, असे सांगण्यात येत आहे.
थेट फुफ्फुसात
कोरोना, न्युमोनिया इत्यादी आजारांचा सवांधिक वाईट परिणाम फुफ्फुसांवर आणि श्वसन यंत्रणेवर होतो. श्वसनावाटे लस घेतल्यास ती क्षणभरात फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. त्यामुळे फुफ्फुसांचे चांगल्या प्रकारे संरक्षण होऊन त्यांचे कोरोना किंवा तत्सम विषाणूंचा संसर्ग होण्याआधीच संरक्षण होऊ शकते. फुफ्फुसावाटे ही लस शरीरात पोहोचल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्यही ती प्रभावीपणे करते, असे प्राथमिक प्रयोगातून दिसून आल्याचे सांगण्यात येते.
सुईविना लसीकरण
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लस घेतल्याने कोणत्याही प्रकारचा सुईचा शरीराशी संबंध येत नाही. त्यामुळे सुईवाटे होणारा संसर्ग टाळला जातो. परिणामी हे तंत्रज्ञान अधिक सुरक्षितरीत्या लस शरीरात पोहोचविण्याचे कार्य करते, असे संशोधकांना आढळले आहे.
हवेतून प्रसारावर प्रतिबंध
कोरोना, क्षयरोग, फ्लू, इबोला इत्यादी विकारांचे जंतू मानवी शरीरात हवेतून श्वासावाटे प्रवेश करतात. या आजारांचा प्रसार प्रामुख्याने हवेतील जंतूंच्या माध्यमातूनच होतो. श्वासावाटे लस घेण्याचे तंत्रज्ञान अवलंबिल्यास अशा जंतूसंसर्गाला तात्काळ अटकाव करता येतो.
लवकरच उपलब्ध होणार
सध्या या तंत्रज्ञानावर विविध प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. चाचण्या घेतल्या जात असून त्यांचे परिणाम उत्साहवर्धक असल्याचे सांगण्यात येते. अद्याप हे तंत्रज्ञान पहिल्या टप्प्यात असले तरी लवकरात लवकर ते सर्वांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तंत्रज्ञानाचा विकास एकदा पूर्णत्वास गेल्यानंतर ते पुढे कायमस्वरुपी मानवाच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.









