कोरोना संचारबंदीदरम्यान कॅनडातील महिलेचा प्रताप ः 2 लाख रुपयांचा दंड
कॅनडातील एक प्रकरण समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे. येथे एक महिला स्वतःच्या पतीच्या गळय़ात पट्टा अडकवून त्याला हिंडवत होती. हा प्रकार रात्रसंचारबंदी लागू असताना घडल्याने पोलिसांनी दोघांवर 3 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना कॅनडाच्या क्यूबेक शहरात घडली असून तेथे प्रशासनाने रात्री 8 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा केलेली आहे.
एका महिलेने एका पुरुषाच्या गळय़ात पट्टा घालून त्याला एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला हिंडवत असल्याचे पोलिसांना दिसून आले होते. घटनेवेळी रात्रीचे 9 वाजले होते. संबंधित महिला तसेच पुरुष हे पती-पत्नी आहेत. या कृत्यासाठी त्यांच्यावर केवळ दंड ठोठावण्यात आला आहे. घरापासून 1 किलोमीटरपर्यंत स्वतःच्या श्वानासह फिरण्याची अनुमती देण्यात आल्याने हे कृत्य केल्याचे स्पष्टीकरण महिलेने पोलिसांना दिले आहे.
पतीला श्वानाची उपमा
पोलिसांनी महिलेचे म्हणणे ऐकल्यावर हा श्वान नसून तुमचा पती आहे असे सांगताक्षणी महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांनी दोघांना 1500-1500 डॉलर्सचा दंड ठोठावला. परंतु महिलेने सध्या दंड भरण्यासही नकार दिला आहे. संचारबंदी उल्लंघनाच्या दंडापासून वाचण्यासाठी महिलेने हे नाटक केले होते असे पोलिसांचे मानणे आहे.









