महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार
दुबई / वृत्तसंस्था
भारतीय पुरुष संघातील आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर, महिला संघाची कर्णधार मिताली राज व स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. पुरुष गटात युएईचा फलंदाज वृत्या अरविंद व नेपाळचा दिपेंद्र सिंग एरे हे देखील पुरस्कारासाठी शर्यतीत असतील. महिला गटात मिताली व दीप्ती यांच्यासमवेत न्यूझीलंडची अष्टपैलू ऍमेलिया केर प्रतिस्पर्धी असेल.

श्रेयस अय्यर फेब्रुवारी महिन्यात सर्वोत्तम बहरात होता आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताने जोरदार वर्चस्व गाजवले, त्यात श्रेयसचा वाटा महत्त्वाचा राहिला होता. प्रारंभी त्याने विंडीजविरुद्ध शेवटच्या वनडेत सामना जिंकून देणारी 80 धावांची खेळी उभारली आणि नंतर शेवटच्या टी-20 सामन्यात 16 चेंडूत जलद 25 धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत सुर्यकुमार यादव दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने आणि आघाडीच्या बहुतांशी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने श्रेयसला तिसऱया स्थानी बढती देण्यात आली. याचा पुरेपूर लाभ घेत त्याने 3 सामन्यात 3 नाबाद अर्धशतके झळकावली आणि 174.35 च्या स्ट्राईक रेटने 204 धावांचे योगदान दिले. या सातत्यपूर्ण योगदानामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत मिताली राजने भारतीय संघातर्फे सर्वोच्च तर मालिकेत सर्वोच्च दुसऱया क्रमांकाच्या धावांची नोंद केली. तिने 77.33 सरासरी, 82.56 चा स्ट्राईक रेट व 3 अर्धशतकांसह 233 धावांचे योगदान दिले. मालिकेतील शेवटच्या वनडे लढतीत तिने नाबाद 54 धावांसह फिनीशरची जबाबदारी अतिशय चोख पार पाडली. तिच्या या धमाकेदार अर्धशतकामुळे भारताने 4 षटकांचा खेळ बाकी राखत 252 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
अष्टपैलू दीप्ती त्यावेळी फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर लक्षवेधी कामगिरी साकारण्यात यशस्वी ठरली. तिने वनडे मालिकेत 10 बळी घेतले. शिवाय, फलंदाजीत 5 सामन्यात 116 धावांचे योगदान दिले. यातील चौथ्या वनडेत तिने 4 बळी घेतले आणि पाचव्या वनडेत नाबाद 69 धावांची खेळी साकारली होती.









