प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिनगर येथील ध्यान मंदिरात श्री अम्माभगवान सेवा समितीच्यावतीने नुकतीच परमज्योती अम्मांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी अष्टलक्ष्मी पूजा झाली. समाजातील गोर-गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तु सहज उपलब्ध व्हाव्यात, याकरिता शहराची साफसफाई करणाऱया कर्मचाऱयांना नाष्टा व फराळाचे वाटप करण्यात आले. शिवाय संजीवनी फौंडेशच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी जवळपास 27 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या दिवशी अम्माभगवानांच्या भजन संकीर्तनाचा कार्यक्रम झाला. अम्मा भगवांच्या मूर्तींवर फुलांची आरास करून सजविण्यात आली होती. दरम्यान भक्तांनी श्री अम्माभगवानांची भजने गायिली. शिवाय कोरोना काळात मराठा मंदिरमध्ये उभारलेल्या कोरोना केंद्रात उत्तम सेवा केलेल्या डॉ. सविता देग्नीनाळ व मदन बामणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. अम्मा भगवान समितीतर्फे वर्षभर वृक्षारोपण, अन्नदान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे समाजपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमासाठी अम्माभगवान भक्त मंडळींचे सहकार्य लाभत आहे.