प. पू. सुब्रह्मण्य स्वामी यांचे उद्गार
प्रतिनिधी / पणजी
वैराग्याची शाल पांघरून व ममतेचे आलिंगन देऊन समाजाला समतेचा धडा देणारे श्रीसिद्धारुढ स्वामी हे शिवाचे अवतार होते. दुर्जनांना सज्जन करण्याचे व्रत घेऊन समाजाला नवीन दिशा दाखविण्यासाठी ते सिद्ध आरुढ झाले. त्यामुळेच जनमानसात ते सिद्धारुढ स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले, असे उद्गार कच्चनळी हल्याळ येथील श्री नित्यानंद स्वामी आश्रमाचे पिठाधीश प. पू. ब्रह्मीभूत श्री सुब्रह्मण्य स्वामी महाराज यांनी काढले.
कच्चनळी-हल्याळ कर्नाटक येथे श्रीसिद्धारुढ संप्रदायाचे प. पू. नित्यानंद स्वामी महाराजांच्या 36 व्या पुण्यदिनानिमित्त दि. 10 मार्चपासून विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आशीर्वचन प्रवचनात श्री सुब्रह्मण्य स्वामी महाराज बोलत होते.
ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकतारी तंबोऱयाने अखंड नामस्मरण चालू होते. सहा दिवस चाललेल्या या सोहळ्यात प्रत्येक दिवशी प. पू. श्री सुब्रह्मण्य स्वामी महाराजांची विविध विषयांवर प्रवचने झाली. दि. 14 रोजी श्रीस्वामींची ढोल, ताशे व तुतारीच्या गजरात रथयात्रा काढण्यात आली. त्यानंतर तुलाभार तसेच किरिट पूजा करण्यात आली. दि. 15 रोजी कवडी पूजेने सोहळ्याची सांगता झाली.
श्रीसिद्धारुढ स्वामी सांप्रदायाचे इचल क्षेत्र येथील स्वामी शिवानंद भारती यांच्यासह श्रीसिद्धारुढ सांप्रदायाचे अन्य स्वामी तसेच गोव्यासह अन्य राज्यातील भाविक भक्तगण मोठय़ा संख्यने उपस्थित होते.