वनडेसाठी कुशल मेंडिस तर टी 20 साठी वानिंदू हसरंगाकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ कोलंबो
आगामी झिम्बाब्वेविरुद्ध वनडे व टी 20 मालिकेआधी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठे फेरबदल केले आहेत. टी 20 फॉरमॅटमध्ये वानिंदू हसरंगा याला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर, वनडे फॉरमॅटमध्ये कुशल मेंडिस श्रीलंका संघाचा कर्णधार असेल. याशिवाय चरित असलंका दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधाराची भूमिका बजावेल. लंकन क्रिकेट बोर्डाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात नव्या वर्षात तीन वनडे व तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठे फेरबदल केले आहेत. या मालिकेतील पहिला वनडे सामना 6 जानेवारीला होणार आहे. अलीकडेच विश्वचषकादरम्यान दासून शनाकाला दुखापत झाली होती. त्यानंतर कुशल मेंडिस याला कर्णधार बनवण्यात आले. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने 9 सामने खेळले, ज्यात फक्त 2 सामने जिंकले, तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या खराब कामगिरीनंतर श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. मंडळाने नवीन निवड समिती स्थापन करताना तिचे नेतृत्व माजी क्रिकेटपटू उपुल थरंगाकडे सोपवले. याशिवाय माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या याची ‘क्रिकेट सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नव्या निवड समितीने मोठे फेरबदल करत झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी दोन कर्णधार नियुक्त केले आहेत. घरच्या मैदानावर होणाऱ्या या वनडे व टी 20 मालिकेत लंकन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, असे उपुल थरंगाने म्हटले आहे.









