ऑनलाईन टीम/तरुण भारत
श्रीलंकेचे अन्न संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तिकडच्या नागरिकांना सोने खरेदी करण्यापेक्षा दूध विकत घेणे कठीण झाले आहे. सोन्यापेक्षाही दूध महागल्याच बोललं जातंय. तर चिकन हा श्रीलंकेच्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण त्याच्या वाढत्या किमतींमुळे तो सर्वसामान्यांच्या ताटातून गायब झाला आहे. चिकनच्या किमती दुपटीने वाढल्या असून आता तो लोकांसाठी चैनीचा पदार्थ बनला आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे
एन.के सिलोन बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयवर्धने म्हणाले की, काही शहरी भागात स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे ब्रेडच्या किमती सुमारे १५० श्रीलंकन रुपये ($0.75) पर्यंत दुप्पट झाल्या आहेत.जयवर्धने म्हणाले, ‘ही परिस्थिती आणखी आठवडाभर अशीच राहिली तर ९० टक्के बेकरी बंद कराव्या लागतील. अनेक बेकर्सनी कर्ज घेतले आहे, ते कर्ज फेडू शकणार नाहीत. सरकारने ताबडतोब काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.
श्रीलंकेत पेट्रोल 254, डिझेल 214 रुपये प्रति लिटर
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) श्रीलंकेतील उपकंपनीने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे. लंका इंडियन ऑईल कंपनीने (एलआयओसी) सांगितले की, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 75 रुपये आणि पेट्रोलच्या दरात 50 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. आता श्रीलंकेत पेट्रोल 254 रुपये तर डिझेल 214 रुपये प्रति लीटर झालं आहे. एलआयओसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज गुप्ता म्हणाले, श्रीलंकन रुपयाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यामुळे इंधन दरवाढीचा हा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. वाढीव किंमती आजपासून लागू झाल्या आहेत. सात दिवसांतच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचा रुपया 57 रुपयांनी घसरला आहे. याचा थेट परिणाम तेल आणि पेट्रोल उत्पादनांच्या किंमतींवर झाला आहे.