धोतर नेसून तमिळ हिंदू मंदिरात पोहोचले चिनी राजदूत
वृत्तसंस्था/ जाफना
श्रीलंकेतील चीनचे राजदूत ची झेनहोंग यांनी तमिळबहुल भागातील हिंदू मंदिराला भेट दिली आहे. चिनी दूतावासाने या दौऱयाची छायाचित्रे ट्विट केली आहेत. श्रीलंकेतील हा तमिळबहुल भाग भारतासाठी महत्त्वाचा आहे. याच भागात तमिळांचे हिंसक आंदोलन चालले होते. अशा स्थितीत चिनी राजदूतांच्या मंदिर दौऱयावर भारत सरकार तसेच तज्ञांची नजर राहिली होती.
छायाचित्रांमध्ये झेनहोंग हे जाफनाच्या ऐतिहासिक नल्लूर कंडास्वामी कोविल मंदिराबाहेर प्रसादाचे पात्र हातात घेऊन असल्याचे दिसून येते. झेनहोंग यांनी मंदिरात जाण्यासाठी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. पुजाऱयांनी पारंपरिक तमिळ हिंदू पद्धतीने त्यांचे स्वागत केले.
मच्छिमारांना सामग्री प्रदान
झेनहेंग यांनी धार्मिक अन् सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करत मंदिराचा दौरा केल्याचे चिनी दूतावासाने सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच त्यांनी मंदिरासाठी देणगी देखील दिली. जाफना सार्वजनिक वाचनालयाला त्यांच्याकडून पुस्तके प्रदान करण्यात आली. नॉर्दर्न प्रांताचे गव्हर्नर जीवन त्यागराज यांची भेट घेत परस्पर सहकार्य वाढविणे आणि तमिळ समुदायाचे उत्पन्न वाढविण्याच्या पद्धतींवर चर्चा केली. चिनी अधिकाऱयांनी जाफना आणि मन्नारच्या मच्छिमारांना मासेमारीचे साहित्य अन् फेस मास्क प्रदान केल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले.
भारतासाठी महत्त्वपूर्ण
तमिळबहुल उत्तर श्रीलंका भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. श्रीलंकेपासून वेगळे होत स्वतंत्र देशाची मागणी करत लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच एलटीटीईने तेथे हिंसक आंदोलन चालविले होते. याच गटाचे सदस्य माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सामील होते. श्रीलंकेच्या सिंहलीबहुल भागात चीनचा मोठा प्रभाव आहे, पण तमिळबहुल भागात ड्रगनला आता स्वतःच्या प्रभावाचा विस्तार करता आलेला नाही. याच भागात चिनी कंपनीच्या हायब्रिड पॉवर प्रकल्पाची योजना रोखण्यास भारताने भाग पाडले होते.
भारताला वाटणारी चिंता
चीन या भागात स्वतःचा प्रभाव निर्माण करत भारताच्या हितांना नुकसान पोहोचवू शकतो. याचबरोबर हा भाग स्वतःच्या विशिष्ट ओळखीवरून अत्यंत संवेदनशील आहे. चीनने येथे प्रभाव निर्माण केल्यास तो भारताच्या सागरी सीमेच्या अत्यंत नजीक पोहोचणार आहे.









