ऑनलाईन टीम/तरुण भारत
श्रीलंकेत महागाईचा भडका उडालेला असताना आता जनताही सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. लोक आक्रमक झाल्याने याला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणीची स्थिती जाहीर केली असून, सुरक्षा दलांना संशयितांना तात्काळ अटक करण्याचा आणि ताब्यात घेण्याचा अधिकार दिला आहे. राजधानीत शेकडो निदर्शक जमल्यानंतर राजपक्षे यांनी सार्वजनिक आणीबाणी जाहीर करणारे राजपत्र जारी केले. तसेच अनेकांनी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या खराब व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, श्रीलंकेची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. देशातील जनता रस्त्यावर उतरली असून राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अनियंत्रित परिस्थिती पाहता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणी जाहीर केली आहे. देशभरात तात्काळ प्रभावाने कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी कोलंबोमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले आणि कर्फ्यू मोडून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
महागाई आणि ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे संतापलेले लोक राष्ट्रपतींना राजीनामा देण्याचे आवाहन करत आहेत. देशाच्या आर्थिक स्थितीला सध्याच्या सरकारची धोरणे कारणीभूत आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. राजधानी कोलंबोमध्ये हिंसाचार सुरूच आहे. लोकांनी वाहनांना आग लावायला सुरुवात केली आहे. सुरक्षा दल आणि सामान्य जनता आमनेसामने आली आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी फायर गॅस सोडण्यात आला.श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात १० जण जखमी झाले आहेत. तर ५० हून अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. परिस्थिती इतकी बिघडली की स्पेशल टास्क फोर्सला पाचारण करावे लागले आहे. मात्र, अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. ही परिस्थिती पाहता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजपत्र जारी करून १ एप्रिलपासून संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.









