- भारतीय तटरक्षक दलाने केली तत्काळ मदत
ऑनलाईन टीम / कोलंबो :
श्रीलंकेतील पूर्व किनाऱ्यावर उभ्या असलेल्या तेल टॅंकर ‘एमटी न्यू डायमंड’ ला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने तत्काळ सहाय्य केले.

याबाबत अधिक महिती देताना भारतीय तटरक्षक दलाने गुरुवारी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच आम्ही आमची तीन जहाजे आणि एक डोर्नियर विमानाला घटनास्थळी पाठवले.
पुढे ते म्हणाले की, श्रीलंकेच्या तटरक्षक दलाने त्यांच्या पूर्व किनाऱ्यावर उभ्या असलेल्या टॅंकरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत मागितली होती. त्यामुळे लगेचच आम्ही त्यांना मदतीसाठी भारतीय तटरक्षक दलाची शौर्य, सारंग आणि समुद्र पहारेदार ही तीन जहाजे आणि एक डोर्नियर विमान पाठवले.
या घटनेची माहिती तटरक्षक दलाने भारतीय रक्षा मंत्रालय आणि भारतीय विदेश मंत्रालयाच्या अधिकारी प्रवक्त्याला टॅग करत एका ट्विट द्वारे दिली. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की संबंधित टॅंकर हा श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून 37 समुद्री मैल अंतरावर होता. त्यांनी मदत मागताच भारतीय तटरक्षक दलाने तत्काळ त्यांच्या साहाय्यासाठी जहाजे आणि विमान पाठवले.









