प्रतिनिधी / खानापूर
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी शिलान्यास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अयोध्येत झाला. त्यानिमित्ताने खानापुरात श्रीरामसेना हिंदुस्थान तालुका भाजप, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने विविध कार्यक्रमाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील श्रीरामसेना हिंदुस्थानच्यावतीने लक्ष्मीमंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी संघटनेच्यावतीने कारसेवकांचा सत्कारही करण्यात आला. यानिमित्त लक्ष्मी मंदिरात श्रीरामाची खास मुर्ती बसविण्यात आली होती.
प्रारंभी श्रीरामसेना हिंदुस्थानचे प्रमुख पंडित ओगले यांनी स्वागत केले. महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते श्रीरामाची पुजा करण्यात आली. यानंतर महाआरती झाली. यानंतर संघटनेच्यावतीने अयोध्येत 1992 साली झालेल्या कारसेवेत सहभागी झालेले आर. पी. जोशी, सदानंद कपिलेश्वरी, ऍड. मदन देशपांडे, दिलीप पाटील, सुभाष देशपांडे, वसंत देसाई यांचा सत्कार पंडित ओगले, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, किरण येळ्ळूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब सावंत, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, किरण येळळूरकर तसेच ज्योतीबा रेमाणी, आर. पी. जोशी व पंडित ओगले आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन ऍड. आकाश अथणीकर यांनी केले. याचवेळी मुसळधार पाऊस सुरू होता. तरीदेखील या सोहळय़ाला युवावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
तालुका भाजपतर्फे आनंदोत्सव
खानापूर तालुका भाजपच्यावतीनेही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी शहरातील संत बसवेश्वर महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, ता. अध्यक्ष संजय कुबल व इतर पदाधिकाऱयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मिठाई वाटण्यात आली. यानंतर मलप्रभा नदीकाठावरील श्रीराम मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1992 साली झालेल्या कारसेवेत सहभागी झालेले आर. पी. जोशी, ऍड. मदन देशपांडे, सदानंद कपिलेश्वरी, दिलीप पाटील यांनी आपले कारसेवेतील अनुभव कथित केले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमात तालुका उपाध्यक्ष अप्पय्या कोडोळी, ज्योतीबा रेमाणी, किरण येळ्ळूरकर, धनशी सरदेसाई, राजेंद्र रायका, अवधुत बेंद्रे, सागर चौगुले, महांतेश बाळेकुंद्री यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटनांनीही यानिमित्त आनंदोत्सव साजरा केला..