ऑनलाईन टीम / पुणे :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान दरवर्षी संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा दिनांक २५ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होणारा संगीत महोत्सव कोरोना विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दरवर्षी संगीत महोत्सव आयोजित केला जातो. मात्र, कोरोनाचा पुण्यामध्ये वाढता प्रादुर्भाव आणि जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार ट्रस्टने यंदाचा संगीत महोत्सव रद्द केला आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक येत आहेत. मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांनी मंदिरात गर्दी करुन प्रत्यक्ष दर्शन घेण्याऐवजी ऑनलाईन दर्शन घ्यावे. ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अॅप येथे श्रीं चे ऑनलाईन दर्शन घ्यावे. गर्दीमध्ये न मिसळता कोरोनाची भीषणता संपेपर्यंत भाविकांनी मंदिरामध्ये येण्याचे टाळावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.









