प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे एकाच रात्री तब्बल सहा घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले आहेत. या घटनेने ग्रामीण भागात विशेषतः श्रीपत पिंपरी येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद घाडगे यांचे गावातच किराणा दुकान आहे. दि १९ रोजी रात्री नेहमीप्रमाणे साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले आणि जेवण वैगरे करून झोपले. आज सकाळी सहा वाजता आनंद यांची पत्नी शीतल ही साफसफाई करण्यासाठी दुकानाकडे गेली असता दुकानाच्या दरवाजाला कुलूप दिसले नाही. तिने घरी जाऊन रात्री याबाबत चौकशी केली. त्यानंतर दुकान मालक आनंद घाडगे यांनी दुकानात जाऊन बघितले तर दुकानाच्या कॅश काउंटर मधील साडेसहा हजार रुपयांची रक्कम कोणीतरी चोरून नेली असल्याचे स्पष्ट झाले. तसेच गावातील सतीश हनुमंत व्यवहारे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील सुमारे चार हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत.
तर संतोष कृष्ण पिंगळे यांच्या घराचे कुलूप तोडून आठ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत तसेच हनुमंत विलास चव्हाण यांच्या घरातून १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. तर गावातील महादेव बापू जाधव आणि रामा गणपत ताकभाते यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे एकाच रात्री सहा ठिकाणी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत भा द वि ३८०,४५७ प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ए एस आय प्रवीण जाधव करीत आहेत.
Previous Articleपोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक प्रदान
Next Article मुख्याध्यापकासह काही शिक्षक पॉझिटिव्ह









