ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरच्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन नागरिकांसह सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील प्रताप पार्क जवळील लाल चौकात सीआरपीएफची C/171 तुकडी तैनात करण्यात आली होती. या तुकडीवर आज दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकांसह दोन सीआरपीएफचे जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
काश्मीरच्या लाल चौक परिसरात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होते. सुरक्षा दलाला त्याची माहिती माहिती मिळाली असून, शोधमोहीम सुरू आहे. यापूर्वीही 24 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर मधील जुन्या शहरात नूरबाग परिसरातील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता.









