ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला 5 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुटीरतावादी आणि पाकिस्तानी गट काळा दिवस साजरा करत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आज आणि उद्या (दि.5) श्रीनगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
श्रीनगरचे जिल्हा दंडाधिकारी शाहिद चौधरी म्हणाले, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णय मागील वर्षी 5 ऑगस्टला घेतला. या घटनेला एक वर्ष होत आहे. त्यामुळे विरोधक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 4 आणि 5 ऑगस्टला कर्फ्यू लागू केला आहे.
यापूर्वी सोमवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यावर 5 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये 4 आणि 5 ऑगस्टला लोकांच्या जाण्यायेण्यावर कठोर निर्बंध असतील. कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









