ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरमधील कानीमजार नवाकदाल भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांना यश आले. लष्कराने या दहशतवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील नवाकदल परिसरातील दाट लोकवस्तीत सोमवारी मध्यरात्री शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता. आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला लष्कर आणि पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाचे जवान आणि काश्मीर पोलिसांना यश आले.









