39 घरांमध्ये अतिक्रमण : घरे रिकामी करण्यासाठी सात दिवसांची दिली होती मुदत
प्रतिनिधी /बेळगाव
श्रीनगर परिसरात मनपाच्यावतीने आश्रय योजनेंतर्गत तीन मजली इमारतीची उभारणी करून लाभार्थीना घरे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र येथील 39 घरांमध्ये अतिक्रमण करून ताबा घेतला असल्याने मनपा नोटीस बजावून सात दिवसांत ताबा सोडण्याची सूचना केली आहे. पण नोटीस बजावून सात दिवस उलटले तरी मनपाकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
महापालिकेकडून विविध ठिकाणी आश्रय योजनेंतर्गत घरांची उभारणी करून लाभार्थीना घरे मंजूर केली आहेत. श्रीनगर आणि कणबर्गी येथे तीन मजली इमारतीची उभारणी करून आश्रय योजनेतील लाभार्थीना घरे मंजूर केली आहेत. पण या इमारतीमध्ये काही घरांमध्ये काही जणांनी अतिक्रमण करून घरांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अतिक्रमण केलेल्या घरांचे सर्व्हेक्षण करून अतिक्रमितांची माहिती घेतली होती. तसेच आश्रय विभागाच्यावतीने अतिक्रमितांना नोटीस बजावली होती. अतिक्रमण केलेल्या नोटिसा स्वीकारल्या नव्हत्या. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या घरांच्या दरवाजावर नोटीस चिकटवून सदर घरे सात दिवसांत रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच घराचा ताबा सात दिवसांत न सोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
अतिक्रमण केलेल्यांनाच घरे मंजूर करणार का? श्रीनगर येथील 39 घरांमध्ये अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे घरावर नोटीस चिकटविण्यात आली होती. सदर नोटीस बजावून सात दिवस उलटले तरी मनपाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमण केलेल्यांनाच घरे मंजूर करणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. घरांसाठी पात्र लाभार्थीनी मनपाकडे रक्कम जमा केली आहे. पण घरांचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थीना घरांचा ताबा कधी देणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.









