- तृतीयपंथी व देवदासी महिलांची भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना
ऑनलाईन टीम / पुणे :
भगवान श्रीकृष्णा ज्याप्रमाणे तू नरकासूराच्या तावडीतून 16 हजार महिलांची मुक्तता केलीस, त्याप्रमाणे आमच्यावर एकप्रकारे आलेल्या नरक यातनेतून आम्हाला मुक्त कर. आमचे आयुष्य अंध:कारातून प्रकाशमय होवू देत, अशी प्रार्थना तृतीयपंथी व देवदासी महिलांनी भगवान श्रीकृष्णाकडे केली. श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्याचे पूजन करुन दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे जगोबादादा वस्ताद तालीमसमोर असलेल्या बुधवार पेठ देवदासी महिला ऑफिसमध्ये तृतीयपंथी व देवदासींच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन व फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पियुष शाह, संकेत निंबाळकर, नरेंद्र व्यास, अभिजीत चव्हाण, अभिषेक मारणे, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, शिवाजी मिळकरी, मयूर जातुरकर, सुवर्णा पोटफोडे आदी उपस्थित होते. हर्ष चव्हाण या चिमुकल्याने कृष्णांची वेशभूषा केली.
महिलांनी श्रीकृष्णाला लाडू भरवून दिवाळीचा सण आनंदाने साजरा केला.
पियुष शाह म्हणाले, दिवाळी चा सण म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण असतो. मात्र, आज देखील आनंद व प्रकाशापासून बुधवार पेठ परिसरातील देवदासी महिला व तृतीयपंथी वंचित आहेत. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना आनंदाचे काही क्षण अनुभविता यावे, याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.









