ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/कौलालंपूर
भारताच्या अनुभवी किदाम्बी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत भारताचे आव्हान जिवंत राखले. त्याने फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हवर तीन गेम्समध्ये संघर्षपूर्ण विजय मिळविला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो आव्हान संपुष्टात आले. श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत 65 स्थानावर असून त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप व आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदके मिळविली आहेत. त्याने 18 व्या मानांकित टोमा पोपोव्हविरुद्ध झुंजार खेळ करीत 24-22, 17-21, 22-20 असा विजय मिळविला. ही चुरशीची झुंज एक तास 14 मिनिटे रंगली होती.
श्रीकांतची उपांत्य लढत जपानच्या युशी तनाकाशी होईल. वर्षभरात उपांत्य फेरीत खेळण्याची श्रीकांतची ही पहिलीच वेळ आहे. तनाकाने फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हचा 21-18, 16-21, 21-6 असा पराभव केला. ख्रिस्तो हा टोमा पोपोव्हचा भाऊ आहे. दुसरी उपांत्य लढत जपानचा चौथा मानांकित कोदाय नाराओका व चीनचा दुसरा मानांकित लि शि फेंग यांच्यात होईल.NBया स्पर्धेत श्रीकांत हा एकमेव भारतीय खेळाडू राहिला असून मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. कपिला व तनिशा यांनी चीनच्या अग्रमानांकित जिआंग झेन बँग व वेइ या झिन यांच्याशी झुंजार लढत दिली. पण अखेर त्यांना 22-24, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला.









