ऑनलाईन टीम / पुणे :
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात बेलाच्या पानांच्या भव्य प्रतिकृतीची आरास करण्यात आली. बेलाची पाने आणि विविधरंगी फुलांनी मंदिराचा गाभारा व सभामंडप सजविण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाहेरुनच दर्शन घेतले, तसेच मंदिरात केवळ धार्मिक विधी पार पडले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त अंकुश काकडे यांसह कर्मचारी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा 123 वे वर्ष आहे. मंदिरात रुद्रयाग व हवन यशोधन शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते पार पडला. पूजेला 1008 बिल्वपत्र अर्पण करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी बेलाच्या पानांची ही आकर्षक आरास करण्यात आली. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी देखील पार पडले. ट्रस्टच्या विश्वस्तांच्या आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, याकरीता प्रार्थना करण्यात आली.