रत्नागिरीनजीकच्या पोमेंडीतील रानभाजी महोत्सवात 50 रानभाज्यांची ओळख
रोगप्रतिकार शक्तीवाढीसाठी ठरताहेत `बुस्टर डोस’
प्रतिनिधी / रत्नागिरी
रोगप्रतिकारक शक्ती वाढीसोबतच अनेक व्याधींवर गुणकारी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या रत्नागिरीतील डोंगर-दऱ्यांमध्ये बहरल्या आहेत. या भाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. यात अर्थार्जनातही मोठा वाव आहे. यासाठी रत्नागिरीत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव भरवण्यात आला होता. या प्रदर्शनात तब्बल 33 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या आणि 17 रानभाज्यांची हातोहात उचलही करण्यात आली.
रोगप्रतिकार शक्तीसाठी ‘बुस्टर डोस’ ठरणाऱ्या रानभाज्या बहरल्या आहेत. नैसर्गिकरित्या येणाऱ्या या रानभाज्या कीटकनाशकमुक्त आहेत. कोणतीही औषधी फवारणी न करता नैसर्गिकरित्या उगवलेल्या या रानभाज्यांची खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना चांगलीच ओळख आहे. श्रावणात तर या भाज्यांना बहर येतो. रत्नागिरी शहरानजीकच्या पोमेंडी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव पार पडला. जिल्हा व तालुका कृषी विभागामार्फत एकलव्य शेतकरी गटामधून शेतकऱ्यांनी रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात 33 रानभाज्या प्रदर्शनासाठी तर 17 विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम कांबळे, माजी सभापती मंगेश साळवी, प्राजक्ता पाटील, माजी जि. प. सदस्या विनया गावडे, पोमेंडीच्या सरपंच भारती पिलणकर, उद्योजक आण्णा सामंत, तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आहारतज्ञ डॉ. आशुतोष गुर्जर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी घोरपडे, शिरगाव संशोधन केंद्राचे डॉ. व्ही. व्ही. दळवी, आत्मा प्रकल्प उपसंचालक उर्मिला चिखले, उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. एम. हेगडे, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रदर्शनाला 350 ते 400 नागरिकांनी भेट देत रानभाज्यांचे महत्व जाणून घेतले.

जैवविविधतेसह रानभाज्यांचेही जतन करण्याचा सल्ला
या कार्यक्रमांत उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे महत्व पटवून देत त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. रानभाज्या समूळ नष्ट होणार नाहीत, यांची सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला आर्युर्वेदाचार्य डॉ. आशुतोष गुजर यांनी दिला. रानभाज्यांचा व्यावसायिक विचार केल्यास अर्थार्जनासही उपयुक्त असल्याचे जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांनी सांगितले. रानभाज्यांचे आहारात महत्व असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी घोरपडे यांनी सांगितले.









