ऑनलाईन टीम / लखनऊ :
स्थलांतरीत मजुरांना उत्तरप्रदेशातील बलियाकडे घेऊन निघालेल्या श्रमिक विशेष ट्रेनचा मार्ग चुकल्याने ही ट्रेन थेट नागपूरला पोहचली.
मजुरांना घेऊन ही ट्रेन गुरुवारी गोव्यामधूनउत्तर प्रदेशमधील बलियाच्या दिशेने निघाली होती. गोवा ते बलिया हे अंतर 2 हजार 245 किमी आहे. त्यामुळे या प्रवासासाठी 28 तास लागतात. मात्र, ही ट्रेन मार्ग चुकल्याने नागपूरला गेली. त्यामुळे बलियाला पोहोचण्यासाठी 72 तास लागले.
लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना मूळ गावी सोडण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत. मात्र, या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना सुखकर प्रवासापेक्षा त्रासच अधिक सहन करावा लागत आहे. ट्रॅकवर दिशाहीनपणे धावत असलेल्या रेल्वेगाड्या आपल्या अंतिम स्थानकापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन-चार दिवस लावत आहेत. यापूर्वीही उत्तरप्रदेशातील गोरखपूरला जाणारी ट्रेन ओडिशातील रुरकेला पोहचली होती.









