प्रतिनिधी/ वाळपई
पंचायत खात्याने शौचालयाची योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे सोपस्कार पूर्ण करण्याकरता अवघे दोनच दिवसाची मुदत दिली आहे. शनिवारी व रविवारी या दोन दिवसात या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे सोपस्कार पूर्ण करुन ते संबंधित पंचायतीमध्ये सादर करण्याचे आदेश पंचायत खात्याने दिले आहेत. यामुळे सत्तरी तालुक्मयात रविवारी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
सरकारी कार्यालय बंद असल्यामुळे हा सोपस्कार नागरिक पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सरकारने ही मुदत निदान पंधरा दिवस तरी वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
या योजनेसंबंधी एक परिपत्रक शुक्रवारी पंचायत खात्याच्या माध्यमातून जारी करण्यात आले. सदर परिपत्रकानुसार शनिवारी व रविवारी या दोन दिवसात ज्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित पंचायतीकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी व रविवारी या दोन्ही दिवसात मामलेदार कार्यालय बंद असल्यामुळे अनेक नागरिक ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. दोन दिवसात ही कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करणे अवघड असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.









