रेल्वेस्टेशन समोरील बसस्थानकाचे बांधकाम सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत रेल्वेस्टेशन समोरील बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यामुळे येथील शौचालय व मुतारी बंद करण्यात आली आहे. शौचालय नसल्याने येणाऱया-जाणाऱया प्रवाशांची कुचंबना होत आहे. या परिसरात रेल्वे व बससाठी शेकडो प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण शौचालय व मुतारीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत असल्याने आतमधील पे टॉयलेट बंद करण्यात आले आहे. बसस्थानकात जाणाऱया मार्गावर पत्रे लावून मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची कुचंबना सुरू आहे. रेल्वेस्थानकासमोरील भागात काही फिरते शौचालय आणण्यात आले असले तरी त्यांनाही कुलूप लावण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना शौचालयासाठी एकतर गोवावेस किंवा धर्मवीर संभाजी चौक येथे यावे लागणार आहे.
या बसस्थानकात ग्रामीण भागासोबतच गोवा व कोकणात जाणाऱया बस येतात. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची ये-जा सुरू असते. हेस्कॉमचे कार्यालयही याच परिसरात आहे. रेल्वेस्थानकावर येणाऱया प्रवाशांची संख्याही अधिक असते. रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये शौचालय असले तरी ज्यांच्याकडे तिकीट आहे अशाच प्रवाशांना आत प्रवेश देण्यात येत असल्यामुळे इतर प्रवाशांनी करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शौचालय सुरू करण्याची मागणी
बसस्थानकाचे बांधकाम सुरू असले तरी आतमधील पे टॉयलेट बांधकाम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. नाही तर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. पुरुषांपेक्षा महिलांना याचा त्रास सर्वाधिक होत असून लोकप्रतिनिधी तसेच अधिकारीवर्गाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.









