आयपीएल लिलावाचा आज पूर्वार्ध ः शार्दुल ठाकुर, चहर, इशान किशनला करारबद्ध करण्यासाठी जोरदार रस्सीखेच अपेक्षित
बेंगळूर / वृत्तसंस्था
डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू शार्दुल ठाकुर, विदेशी स्तरावर डेव्हिड वॉर्नर, डी कॉक, रबाडा, होल्डर यांच्यासारखे अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू आज होणाऱया मेगा ऑक्शनमध्ये बोलीसाठी पुकारले जातील, त्यावेळी जणू त्यांचा ‘शो मी द मनी’ हाच त्यांचा नारा असेल. आज (शनिवार दि. 12) व उद्या (रविवार दि. 13) असे दोन दिवस इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे ‘मेगा ऑक्शन’ रंगणार असून आज पहिल्या दिवसात एकूण 161 खेळाडूंचा लिलाव रंगेल. दुपारी 12 वाजता पहिल्या दिवसाच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात होत असून त्याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.
यंदा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स व लखनौ सुपरजायंट्स या 2 नव्या प्रँचायझींची भर पडली असून यामुळे नेहमीच्या 8 ऐवजी 10 प्रँचायझी लिलाव प्रक्रियेत सहभागी असतील आणि अर्थातच आणखी रस्सीखेच रंगेल, हे निश्चित आहे.
दोन दिवसांच्या या लिलावात एकूण 590 खेळाडू उपलब्ध असून त्यात 227 विदेशी खेळाडू समाविष्ट आहेत. यंदाच्या लिलावात किमान 10 खेळाडूंना 7.5 कोटी व त्याहून अधिक बोली अपेक्षित असून काही खेळाडूंना अगदी 20 कोटी रुपयांची बोली देखील लागू शकते.
एकीकडे, श्रेयस अय्यरला 20 कोटी रुपयांच्या आसपास बोली लागण्याची सर्वाधिक शक्यता असून शार्दुल, इशान किशन (यष्टीरक्षक-फलंदाज) यांचे अष्टपैलूत्व विशेष महत्त्वाचे ठरु शकते. शार्दुल-इशानला करारबद्ध करण्यासाठी लिलावात चुरस निर्माण झाल्यास त्यांना 12 ते 15 कोटी रुपयांची रेंज फारशी कठीण नसेल.
महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपरकिंग्स), विराट कोहली (आरसीबी) व रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) या मेगास्टारना त्यांच्या संघांनी रिटेन केले असून हे संघ आता मध्यफळी, अष्टपैलू खेळाडू आणि उत्तम मनगटी गोलंदाज करारबद्ध करण्यासाठी अधिक प्रयत्नशील असू शकतात.
केएल राहुलला (17 कोटी) सर्वाधिक रिटेन्शन प्राईस मिळाली असून दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला पंजाब किंग्स (पर्स-72 कोटी), सनरायजर्स हैदराबाद (68 कोटी), राजस्थान रॉयल्स (62 कोटी) या 3 प्रँचायझींकडून अधिक बोलीची अपेक्षा आहे. या प्रँचायझींना सॉलिड मिडल-ऑर्डर गेमचेंजर्सची गरज असून मयांक अगरवाल किंवा केन विल्यम्सनला करारबद्ध करण्यावर देखील त्यांचा फोकस असेल.
धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स संघ अव्वल परफॉर्मरवर लक्ष केंद्रित करण्याची चिन्हे असून पंजाब-राजस्थानसारखे संघ डावखुऱया खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे संकेत आहेत. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरला करारबद्ध करण्यावर आपला भर असेल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वरुण चक्रवर्तीसारख्या केव्हाही पूर्ण तंदुरुस्त नसणाऱया आणि आयपीएलचा अपवाद वगळता क्वचितच व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱया खेळाडूसाठी मोठी रक्कम मोजली असल्याचा अद्यापही या संघाला फटका बसत आला आहे. प्रत्येक संघाला आपल्या रोस्टरवर किमान 18 खेळाडू असतील, याची तजवीज करावी लागणार असल्याने भारतीय युवा खेळाडूंसाठी देखील ही उत्तम मागणी असणार आहे. याचमुळे मागील वर्षातील पर्पल कॅप विनर हर्षल पटेलने आपली बेस प्राईस 2 कोटी रुपये इतकी ठेवली आहे.
अवेश खानने स्वतःला 20 लाख रुपयांच्या कॅटेगरीत ठेवले असले तरी त्याच्यासाठी या रकमेच्या दहापट बोली लागली तरी त्यात आश्चर्याचे कारण नसेल. रविचंद्रन अश्विन व अजिंक्य रहाणेसारखे खेळाडू टी-20 मध्ये फारसे चालत नाहीत, असे गृहित धरले तरी त्यांचा अनुभव पाहता त्यांना टेकर्स लाभू शकतात. अम्बाती रायुडूलाही 7 ते 8 कोटी रुपयांची बोली लागू शकते. भुवनेश्वर कुमार बॅड पॅचमध्ये असला तरी त्याच्यासह पुनरागमनवीर कुलदीप यादवला करार मिळण्याची अपेक्षा आहे. सईद मुश्ताक अली स्पर्धेत लक्षवेधी योगदान देणाऱया दीपक हुडासाठी देखील काही प्रँचायझींमध्ये चुरस रंगू शकते.
विदेशी खेळाडू वॉर्नर, डी कॉक, रबाडा, होल्डरचे आकर्षण
डेव्हिड वॉर्नर उत्तम बहरात परतला असल्याने त्याला करारबद्ध करण्यासाठी किमान 3 प्रँचायझींमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणे अपेक्षित आहे. विस्फोटक सलामीवीर असणारा डेव्हिड वॉर्नर नेतृत्वही ताकदीने सांभाळू शकतो. गतवर्षी हैदराबादने वाईट वागणूक दिली असली तरी याच खेळाडूंना त्याने 2016 मध्ये जेतेपद मिळवून दिले होते, हे लक्षवेधी आहे. वॉर्नरला करारबद्ध करण्यासाठी लखनौ सुपरजायंटचा संघ ताकद पणाला लावेल, अशी शक्यता आहे. विंडीजच्या जेसॉन होल्डरला करारबद्ध करण्यासाठी आरसीबीने 12 कोटी रुपयांपर्यंत किंमत मोजण्याची तयारी ठेवली असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने यापूर्वीच दिले आहे. त्याचे विंडीज संघसहकारी डेव्हॉन ब्रेव्हो, ओडियन स्मिथ व रोमारिओ शेफर्ड यांनाही उत्तम डील लाभू शकते.
होल्डर व वॉर्नरपेक्षा अधिक किंमत लाभली तर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज डी कॉक यात आघाडीवर राहू शकतो. सध्या दुखापतग्रस्त असलेल्या ऍनरिच नोर्त्झेऐवजी त्याला करारबद्ध करण्यावर दिल्लीचा संघ प्रयत्नशील असू शकेल. मात्र, त्यांच्याकडे फक्त 47.5 कोटी रुपयांची पर्स उपलब्ध असेल, ही त्यांची चिंता आहे. रबाडा देखील लखनौसह अनेक प्रँचायझींच्या विश-लिस्टमध्ये आहे.
शाहरुख, नितीश, राहुल व देवदत्तवरही लक्ष
एम. शाहरुख खान, डावखुरा नितीश राणा, राहुल त्रिपाठीसारखे युवा खेळाडू आपल्या संघात असावेत, यासाठी काही प्रँचायझी प्रयत्नशील असतील आणि यादरम्यान या खेळाडूंना 5 ते 8 कोटी रुपयांच्या घरात बोली लागू शकते. स्टीव्ह स्मिथ, जॉनी बेअरस्टो व इयॉन मॉर्गनसारख्या खेळाडूंचा अनुभव महत्त्वाचा ठरु शकतो. त्यामुळे, त्यांच्यावरही प्रँचायझींचा फोकस असू शकेल. नितीश व राहुलला 10 कोटी रुपयांच्या आसपास तर देवदत्त पडिक्कलला त्यापेक्षा अधिक बोली लागू शकते. अलीकडेच यू-19 विश्वचषक जिंकणाऱया भारतीय संघातील राज अंगद बावा अष्टपैलू असल्याने त्याला बडा करार मिळण्याची शक्यता असेल.
आजवरचे सर्वात महागडे खेळाडू
2021
16.25 कोटी
ख्रिस मॉरिस
राजस्थान रॉयल्स
2015
16 कोटी
युवराज सिंग
दिल्ली कॅपिटल्स
2020
15.50 कोटी
पॅट कमिन्स
केकेआर
2021
15 कोटी
काईल जेमिसन
आरसीबी
2021
14 कोटी
झाय रिचर्डसन
पंजाब किंग्स
2018
11 कोटी
मनीष पांडे
सनरायजर्स हैदराबाद
2021
9.25 कोटी
कृष्णप्पा गौतम
चेन्नई सुपरकिंग्स
2011
9.20 कोटी
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्स









