प्रतिनिधी / लांजा
तालुक्यातील हर्चे गोरेवाडी येथे महावितरणच्या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आंबा-काजूच्या तीन बागा जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान घडली. लागलेल्या आगीने तीन शेतकऱयांचे एकूण 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.
महादेव लक्ष्मण गोरे, संजय तुकाराम गोरे व सुरेंद्र सुधाकर नागवेकर अशी नुकसान झालेल्या शेतकऱयांची नावे आहेत. यात 21 एकर जागेतील फळधारणा होत असलेली आंबा-काजू झाडे जाळून खाक झाली आहेत. तीनही शेतकऱयांच्या बागा काही अंतरावर असल्याने तीनही बागांना आग लागली. हापूसच्या बागेमधून गेलेल्या महावितरणच्या विद्युततारांमध्ये शॉर्टसर्किट लागून बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे पंचनामामध्ये स्पष्ट झाले आहे. शनिवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान ही आग लागली. वाऱयाचा वेग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. गवताचे प्रमाण असल्याने व नजीकच्या अंतरावर असलेल्या तीनही बागा जळाल्या. शेतकऱयांनी बागेच्या दिशेने धाव घेतली, मात्र आगीच्या रौद्ररूपामुळे हापूस-काजूच्या तीनही बागा जाळून झाल्या. एका महिन्यांपूर्वी फवारणी केली होती. तर त्यामधील हापूसच्या झाडांना फळधारणा झाली होती. तीनही शेतकऱयांच्या एकूण 21 एकर जागेतील हापूस 426 तर काजूची 500 कलमे जाळून शेतकऱयांचे 15 लाखाहून अधिक नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य संजय नवाथे, कृषी अधिकारी साळुंखे, हर्चे गावचे तलाठी वंजारे, पोलीस पाटील दीपक तरळ यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची माहिती महावितरण विभागाला देऊनही महावितरणकडून कोणतीच दखल न घेतल्याने शेतकरीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.









