विलास मेथर जळीतकांड प्रकरण
प्रतिनिधी / म्हापसा
साल्वादोर द. मुंद येथे भर दिवसा विलास मेथर यांच्या जळीतकांड प्रकरणी पर्वरी पोलिसांनी 6 जणांना अटक केली असली तरी आज यातील 1 कंट्राक्टदार संशयित आरोपी शैलेश शेट्टी याला येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता त्याला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.
पर्वरी पोलिसांनी यापूर्वी याप्रकरणात 5 जणांना अटक केली होती. असे असले तरी अद्याप मास्टर माईंड कोण आहे याचा थांगपत्ता लागलेला नाही. ही घटना सुपारी देऊन 2 मारेकऱयामार्फत घडवून आणण्यात आली आहे. आजपर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली असली तरी 4 जणांचा बांधकाम क्षेत्राशी संबंध आहे. याप्रकरणी बांधकाम कंट्राक्टदारांची लॉबी पोलिसांच्या रडारवर असून पोलीस संशयित आरोपींचा कसून तपास करीत आहेत.
विलास मेथर यांच्या खुनानंतर पर्वरी पोलीस स्थानक हादरून गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सहावा संशयित आरोपी शैलेश शेट्टी हा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचे निकटवर्गीय असल्याची माहिती हाती आली असल्याने या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. संशयित आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असली तरी पर्वरी पोलीस त्याची चौकशी कशी करतात याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहे.
दरम्यान जळीतकांड प्रकरणातील मास्टर माईंडला शोधून काढा व अटक करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. या प्रकरणात अन्य काही संशयति अटक होण्याची शक्यता आहे. वलास मेथर यांचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला असून शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.









