शैलेंद्रचे वडिल प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा आरोप
पणजी / प्रतिनिधी
क्राईम ब्रांच ने मेळावली आंदोलनासंदर्भात गुरुवारी आपला मुलगा शैलेंद्र वेलिंगकर यास अटक करून क्राईम ब्रांचचे अधीक्षक शोभित सक्सेना यानी त्यांच्या ऑफिसमध्येच त्याला मारहाण केल्याचे आज शुक्रवारी मला कळताच दुपारी 4 वाजता जिल्हा न्यायालयात जामीन सुनावणीच्यावेळी वकिलातर्फे ही मारहाणीची घटना न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीशांनी त्याला त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहे.
शैलेंद्रला जेवण देण्यात आले नाही. तसेच दुपारी 4 वाजता वाळपई कोर्टात नेण्यात आले. गोवा मेडिकलमध्ये न नेता, म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तिथे प्रथम तपासणीत कानाला मार लागून क्लॉट झाला असण्याची शक्मयता वर्तवून उद्या परत बोलावण्यात आले आहे. माझ्या मुलाच्या अटकेमागे भाजपाचे सूडाचे कारस्थान आहे. जामीन मिळू नये आणि रिमांड मिळवून कस्टडीत मारहाण करण्याचा भाजपा कंपूचा इरादा आहे, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
शैलेंद्रला विनाविलंब गोमेकॉत तज्ञ डॉक्टरला दाखवावे. पोलीस अधीक्षक शोभित सक्सेनाने केलेल्या मारहाणीमुळे शैलेंद्रच्या कानाला झालेली इजा गंभीर आहे. त्याला एका कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. सूज येऊन वेदना असह्य झाल्या आहेत. अशा स्थितीत सुसज्ज गोमेकॉत न नेता म्हापसा का नेण्यात आले हे संशयास्पद आहे. आपण मागणी करीत आहे की विनाविलंब शैलेंद्रला गोमेकोतील तज्ञ डॉक्टरकडून तपासून घ्यावे. त्याच्या जीवाला काही अपाय झाल्यास सतीश धोंड, सदानंद तानावडे व स्वतः प्रमोद सावंत हे तिघे जबाबदार राहतील. हे तिघे मिळून मला व माझ्या कुटुंबाला सूडबुद्धीने संपवण्याच्या कारस्थानात सहभागी आहेत, असा अनुभवांती माझा आरोप आहे, असे प्रा. वेलिंगकर यांनी म्हटले आहे.









