आधीच कोरोनाचे गंडांतर, त्यात हिजाबचे संकट : नियोजनाचा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांची चिंता वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा चालला आहे. आधीच कोरोनाच्या गंडांतरामुळे शैक्षणिक नुकसान झाले असतानाच ऐन परीक्षा तोंडावर असताना पुन्हा शाळा-महाविद्यालये बंद झाली आहेत. परिणामी, पालकांमध्ये पाल्यांच्या भवितव्याबाबत चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये बंद राहिली. शिक्षण खात्याने काहीकाळ आभासी पद्धतीने ऑनलाईन वर्ग चालविले. पण परीक्षांनाही फाटा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झाले नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही कोरोनामुळे वारंवार शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. 2 ऑक्टोबरपासून शाळा खुल्या झाल्या. त्यानंतर पुन्हा मागील महिन्यात आठवडाभर हे संकट कायम राहिले.
आधीच ऑनलाईन शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होणार असताना आता गेल्या तीन दिवसांपासून हिजाब प्रकरणावरून शिक्षणक्षेत्रात तीव्र पडसाद उमटले असल्याने 9 वी ते 10 वी पर्यंत शाळा आणि सर्व महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. परिणामी पुन्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
आजपासून प्रॅक्टिकल परीक्षा
गुरुवार दि. 10 रोजीही महाविद्यालये बंद राहणार असली तरी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या आजपासून सुरू होणाऱया परीक्षा कायम असतील. याकाळात महाविद्यालय परिसरात जिल्हा प्रशासन व महाविद्यालयाने सुरक्षेच्यादृष्टीने काळजी घ्यावी, असे निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत. लेखी परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
शासकीय निर्णयांमुळे विद्यार्थ्यांवर तणाव
किमान यंदा तरी दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण वारंवारच्या शासकीय निर्णयांमुळे विद्यार्थ्यांवर तणाव वाढत असल्याचे मत पालकांसह शिक्षक व्यक्त करीत आहेत. शिक्षण खात्याने किमान परीक्षा पूर्ण होईपर्यंत शाळा बंदच्या निर्णयाबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे मत अनगोळ येथील बाळू जाधव यांनी व्यक्त केले.
हा वाद शाळांमध्ये पोहोचणार नाही – बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी
केवळ तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू ठेवले नाहीत. नववी व दहावीचे वर्ग बंद आहेत. वाद शमल्यानंतर सरकारच्या आदेशानुसार शाळा सुरू होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. शिवाय हा वाद शाळांमध्ये पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
विद्यार्थ्यांनी शांतता पाळावी – प्राचार्य एस. एन. पाटील, ज्योती कॉलेज
गुरुवारपासून महाविद्यालयाच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा केवळ विज्ञान शाखेसाठी असतात. त्यामुळे गोंधळाची शक्मयता नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शांतता पाळावी.
सर्वांनीच जबाबदारी घ्यायला हवी – आर. पी. जुटन्नावर, ग्रामीण गटशिक्षणाधिकारी
दोन वर्षे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेच. अतिवृष्टी, कोरोना महामारीनंतरही खात्याने सक्षमपणे अध्यापनाचे कार्य चालविले आहे. हिजाबसारख्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याबाबत सर्वांनीच जबाबदारी घ्यायला हवी. सर्व शाळांतील शिक्षकांना दक्षतेच्या सूचना दिल्या जात आहेत.
शाळा बंदबाबत पालकांमध्ये पुन्हा संभ्रम : शाळा केव्हा सुरू होणार; शनिवारी की सोमवारी?
शाळा बंदच्या शासकीय निर्णयामुळे आधीच पालकांची दमछाक उडाली आहे. नववी आणि दहावीचे वर्ग शनिवार दि. 12 पासून सुरू होतील, असे शिक्षण खात्याने आदेशात म्हटले होते. पण बुधवारी सोमवारपासून शाळा सुरू होतील, असे स्थानिक अधिकाऱयांकडून सांगण्यात आल्याने पालकांमध्ये पुन्हा संभ्रमावस्था पसरली आहे.
हिजाब प्रकरणाचा वाद पेटल्यानंतर माध्यमिक शिक्षण खात्याने सर्व प्रकारची पदवीपूर्व, पदवी व स्नातकोत्तर तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयांसह नववी व दहावीचे वर्ग शुक्रवारपर्यंत बंद करण्याचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले होते. याच दरम्यान बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. प्रसंगी विविध प्रसारमाध्यमांनी सोमवारपासून (दि. 14) शाळा-महाविद्यालये सुरू होतील, असे सांगितल्याने पालकांत संभ्रमावस्था आहे.
याबाबत बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शाळा सोमवारपासून सुरू होतील, असा दावा केला. खानापूरचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी शाळा शनिवारपासून सुरू होतील, असे सांगितले. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाचे व्यवस्थापक वाघमारे म्हणाले, महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने आणि तणाव निवळण्याच्यादृष्टीने असा निर्णय घेतला गेला असेल. पण लिखित आदेश कार्यालयाला प्राप्त झालेला नाही. एकंदर शाळा बंदबाबत पालक-विद्यार्थ्यांमधील संभ्रम मंगळवारपासून कायम आहे. खात्याने याबाबत खुलासा करावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.









