सुभेदार सुमेरसिंह हे उत्तर प्रदेशातील लखनौचे निवासी. सैन्यातील नोकरीच्या निमित्ताने बंगालमधील बोलपूर येथे काही काळासाठी त्यांची शेवटची नेमणूक होती. कंठ संगीतामध्ये गती असणाऱया सुमेरसिंहांच्या सुहानी नावाच्या मुलीस जवळच्याच विश्वभारती केंद्रीय विद्यापीठात ‘बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट (ललित कला) पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला होता. अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष संपता संपता सुहानीचे लग्न छत्तीसगडमधील खैरागडच्या संपन्न कुटुंबात झाले. इकडे सैन्यातील सेवानिवृत्तीमुळे सुमेरसिंह लखनौला परतले होते. सुहानीच्या सासरी काही गैरसमजांमुळे नात्यातील विकोपा वाढीस गेला. सुहानीला आई-वडिलांकडे लखनौला परतण्यावाचून काही गत्यंतर उरले नव्हते. या सर्व प्रवासात गाता गळा आणि गाण्याची विलक्षण समज असणाऱया सुहानीच्या आयुष्यात अंधार दाटला होता. सुहानीची ‘करुण’ गोष्ट ही वय, जात, भाषा, वैवाहिक दर्जा, प्रदेश आदि भेद वगळता देशातल्या कोणत्याही प्रांतात याआधी घडून गेलेली प्रातिनिधिक गोष्ट असू शकते. निव्वळ लग्न, अपत्य निर्मिती वा दुर्धर आजारांसारख्या कारणांमुळे कितीतरी मुलींचे-महिलांचे शिक्षण खंडित होत असते. पुढील आयुष्यात उद्भवणाऱया समस्यांना त्यांना शिक्षणाअभावी कठीण प्रसंगांना सामोरेही जावे लागत असते. अनेक पुरुषांच्या आयुष्यातही नानाविध कारणांमुळे उच्च शिक्षण खंडित होण्याच्या घटना घडत असतात. नवीन शैक्षणिक धोरणातील काही अभिनव पावलांमुळे, काही नवीन शक्मयता उदयास आलेल्या आहेत.
‘ऍकेडेमिक बँक पेडिट’ म्हणजेच शैक्षणिक श्रेयांक बँक ही उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेश (ऍक्सेस), न्याय्य (इक्विटी), समावेशकता (इन्क्ल्युजन) आणि गुणवत्ता (क्वालिटी) वाढवू इच्छिणारे एक रचनात्मक पाऊल आहे. सकलजनांचा विचार करणारी ही रचना उर्ध्वगामी आहे. विद्यार्थी केंद्री आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडण्याचे स्वातंत्र्य देणारी आहे. या प्रस्तावित रचनेमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या अभ्यासक्रमात अनेकवेळा प्रवेश घेण्याची आणि अनेकवेळा अभ्याक्रमातून बाहेर पडण्याची मुभा असेल. शैक्षणिक लवचिकता असणारी ही मुभा श्रेयांक निवड आधारित व्यवस्थेचा (चॉईस बेस्ड पेडिट सिस्टम) भाग असेल. सध्या आपल्या देशामध्ये बहुतांश विद्यापीठांमध्ये श्रेयांक निवड आधारित अभ्यास व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी ही व्यवस्था निव्वळ ‘नावाला’च आहे. या विद्यार्थी केंद्री शिक्षणाचा गाभा आणि आशय समजून घेऊन जुनाट रचना बदलण्याची मानसिकता आपल्याकडे दिसत नाही. भारतीय शिक्षण क्षेत्रात नव्या रचना समजून, उमजून रुजवल्या गेल्या तर त्या विद्यार्थी-शिक्षकांसहित सर्वांसाठी फलदायी ठरू शकतात. समजून न घेता निव्वळ ‘वरून आदेश आल्यामुळे’ अपरिहार्य स्वरुपात आपल्या देशात योजना शेवटच्या क्षणाला पुरेशा तयारीअभावी अमलात आणल्या जातात. त्याचा प्रत्यक्षदर्शी फायदा कुणालाच होत नाही. वार्षिक अभ्यास पद्धतीतून सत्र अभ्यास पद्धतीत येताना अनेकांनी केवळ अभ्यासक्रम विभाजित केल्याच्या पुण्यकर्माची आठवण जाणकारांना असेल. आपापल्या विभागात आणि महाविद्यालयात ‘स्वान्त सुखाय’ रमण्याची सवय लागलेल्या शिक्षाकर्मींना अभ्यासक्रमात आंतरशाखियता (इंटर डिसिप्लनरी) आणि बहुशाखियता (मल्टी डिसिप्लनरी) आणण्यासाठी मनाची आणि विभागाची कवाडे उघडावी लागतील. ‘वर्कलोड’ नावाच्या गैरसमजाचे भूत मानगुटीवरून उतरण्यासाठी ‘लवचिकता’ आणि ‘स्वीकारार्हता’ या दोन गोष्टी आवश्यक असतात. शिक्षणक्षेत्रात त्याची रुजवात झाल्यास शैक्षणिक श्रेयांक बँकेची कल्पना ग्रामीण, अर्धनागरी भागात राहणाऱया विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. श्रेयांक बँक ही विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त उच्चशिक्षण संस्थांमधून श्रेयांक अर्जित करीत, समकक्ष शिक्षण संस्थांमधून पुढील शिक्षण पूर्ण करू देणारी संधी आहे. एखादा विद्यार्थी/विद्यार्थिनी तीन अथवा चार (प्रस्तावित) वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात दाखल झाल्यावर उचित श्रेयांक प्राप्ती करून पहिल्या वषी बाहेर पडल्यास प्रमाणपत्र (सर्टीफिकेट), दुसऱया वषी बाहेर पडल्यास पदविका (डिप्लोमा) आणि तिसऱया वा चौथ्या वषी बाहेर पडल्यास पदवी (डिग्री) मिळेल.
शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील या रचनेचे स्वरुप एखाद्या व्यावसायिक बँकेसारखे असून विद्यार्थ्यांना तेथे आपले खाते निर्माण करून, श्रेयांक प्राप्तीच्या साठवणुकीच्या आणि हस्तांतरणाच्या सेवा घेता येईल. अनेकदा विद्यार्थी नोकरी वा व्यवसायांसारख्या कारणांमुळे ‘बहिस्थ’ वा ‘दूर शिक्षण’ यासारख्या माध्यमांचा उपयोग करतात. हे विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहासोबत स्वत:ला वृद्धिंगत करू शकतील. थोडक्मयात कुणालाही, केव्हाही आणि कुठेही (एनी वन, एनी टाईम, एनी व्हेअर) शिकण्याची संधी मिळणार असल्यामुळे त्यांच्या वाटय़ाला शिक्षणापासून वंचितता येणार नाही. विद्यापीठ व्यवस्थेत विद्यार्थ्यांची गतीशिलता वाढेल. कौशल्याधारित उपक्रमांनादेखील श्रेयांक बँकेसोबत सामावून घेता येईल. उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी आणल्यामुळे शिकण्याचे अवकाश आणि त्याबाबत कराव्या लागणाऱया आर्थिक तजविजीसाठी वेळ मिळेल. स्वत:ला रोजगारक्षम बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अर्धवेळ-पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याची भावना वाढीस लागेल. विद्यार्थ्यांमध्ये-नागरिकांमध्ये स्वत:च्या विकासाबाबत जाणीव वाढवणारी ही भावना निरंतर जीवन शिक्षणाची राहील. जे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून लांब राहिलेले आहेत, ते श्रेयांक बँकेच्या माध्यमातून नोकरीतील बढतीच्या संधींची औपचारिक अर्हता पूर्ण करू शकतील. अनेक ठिकाणाहून मिळवता येणारे श्रेयांकांचे एकाच खात्यामार्फत व्यवस्थापन करता येऊ शकते. हे श्रेयांक हस्तांतरणाचे काम समकक्ष शिक्षण संस्थांमध्येच होणार असल्यामुळे नॅकचे चांगले गुण मिळवण्याची निरोगी भावना शैक्षणिक संस्थांमध्ये रुजल्यास, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे काही अभ्यासक्रम चांगल्या शिक्षण संस्थांकडून आणि प्रथितयश अध्यापकांकडूनदेखील करता येईल.
शैक्षणिक श्रेयांक बँकेने विद्यार्थ्यांच्या नावे दिलेले श्रेयांकाबाबतचे शिफारसपत्र बँकेच्या सदस्य विद्यापीठांना बंधनकारक असेल. विद्यार्थी अर्जित श्रेयांक एका विद्यापीठाकडून दुसऱया विद्यापीठाकडे, एका अभ्यासक्रमातून दुसऱया अभ्यासक्रमासाठीही हस्तांतरीत करू शकतील. अर्थात या हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या मूल्यांकन आणि परीक्षा मंडळाकडेही विवेक आणि लवचिकता असावी लागेल. विद्यापीठे, गुणवत्तेचे भान राखण्यासाठी समकक्ष अथवा उच्च गुणवत्ता संस्थानचेच श्रेयांक स्वीकारतील. यामुळे शिक्षणसंस्थांमधील एकमेकांचे सहकार्य, समन्वयन, निरोगी स्पर्धा वाढीस लागून विद्यार्थी सन्मुख व्यवस्था आकाराला येऊ शकते.
डॉ. जगदीश जाधव








